Sat, Jul 04, 2020 03:43होमपेज › Marathwada › उस्मानाबाद येथे ठेव रकमेसाठी थेट जिल्हा बँकेतच नेला मृतदेह

उस्मानाबाद येथे ठेव रकमेसाठी थेट जिल्हा बँकेतच नेला मृतदेह

Published On: Feb 22 2019 2:02AM | Last Updated: Feb 22 2019 2:02AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

बँकेत असलेली मुदत ठेवीची रक्‍कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठेवीदाराचा मृतदेह जिल्हा सहकारी बँकेत आणून ठेवला. हा प्रकार गुरुवारी सकाळी जिल्हा सहकारी बँकेत घडला.

गुलाबराव वीरभद्र परशेट्टी (वय 70) हे एस.टी.चे सेवानिवृत्त चालक आहेत. निवृत्तीची रक्‍कम त्यांनी जिल्हा बँकेच्या 3 शाखांमध्ये ठेवली होती. मुदत पूर्ण झाली तरी ठेवी परत मिळत नसल्याने परशेट्टी हैराण झाले होते. बुधवारीही त्यांनी बँकेत चक्‍कर मारली होती; पण बँकेकडून त्यांना सकारात्मक माहिती मिळाली नाही. बुधवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच आज सकाळी त्यांचे निधन झाले. आपली मुदत ठेवीची रक्कम मिळत नसल्याच्या चिंतेतून परशेट्टी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत, त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी ठेवीदार असलेल्या परशेट्टींचा मृतदेह थेट जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या दारात आणून ठेवला. या प्रकारामुळे बँकेमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईक परशेट्टींचा मृतदेह घेऊन निघून गेले