Mon, Jul 13, 2020 08:16होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : राष्ट्रवादी भक्‍कम, शिवसेनेत गटबाजी!

उस्मानाबाद : राष्ट्रवादी भक्‍कम, शिवसेनेत गटबाजी!

Published On: Feb 23 2019 1:38AM | Last Updated: Feb 23 2019 10:11AM
भीमाशंकर वाघमारे

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा लगतच्या लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदासंघाला कवेत घेणारा आहे. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडीचे आमदार आहेत. केवळ एक आमदार सेनेचा आहे. त्यामुळे कागदावर तरी राष्ट्रवादीला चांगली स्थिती आहे. 

उस्मानाबाद लोकसभेने 1996 मधील निवडणुकीत कूस बदलत शिवसेनेला संधी दिली. पुढे 1998 मध्ये पुन्हा काँग्रेसने या मतदारसंघावर कब्जा केला. अरविंद कांबळे खासदार झाले. 1999 च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी हा मतदारसंघ हिसकावला. 2004 मध्ये हीच परंपरा कल्पना नरहिरे यांनी कायम राखली. हा मतदारसंघ 2009 मध्ये खुला झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अटीतटीच्या लढतीत विजय मिळविला. ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील खासदार झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातून पिछाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांना सोलापूर जिल्ह्यातील केवळ बार्शी मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाल्याने विजय मिळविता आला. त्यामुळे जिल्ह्यात मताधिक्य मिळूनही केवळ बार्शीमुळे पराभव स्वीकारावा लागल्याची सल शिवसैनिकांच्या मनात होती. ती पुढे प्रा. रवींद्र गायकवाड यांनीच 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला बंपर विजय मिळवून देत दूर केली. अर्थात यात मोदी लाटेचा वाटा सिंहाचा होता. 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीतून आता डॉ. पाटील यांचे नाव वयोमानामुळे बाजूला पडले असले तरी त्यांचे आमदार पुत्र राणाजगजितसिंह पाटील व स्नुषा सौ. अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे भक्‍कम उमेदवार ठरणार असले तरी पक्ष कोणाची निवड करणार यावरच लढतीचे रंगही अवलंबून असतील. या मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघांत लिंगायत समाजाची मते निर्णायक आहेत. सोपल हे अनुभवी व मुत्सद्दी नेते असल्याने तेच यामुळे अधिक प्रभावी उमेदवार ठरतात. तर जिल्ह्यात राष्ट्रवादीवर एकहाती पकड असल्याने आ. पाटील हेही प्रबळ ठरतात. प्रत्यक्षात आगामी विधानसभेत आघाडीची सत्ता आल्यास आ. पाटील हे कॅबिनेट मंत्री होऊ शकतात, असा होरा असल्याने लोकसभेसाठी त्यांची फारशी मानसिक तयारी नसल्याची चर्चा आहे. 

या मतदारसंघात डॉ. पाटील घराणे विरुद्ध भाजप, शिवसेना व काँग्रेसमधील काही बडे नेते अशी छुपी आघाडी असते. या निवडणुकीतही असेच चित्र असेल की, काँग्रेस प्रामाणिकपणे मदत करते यावरही निकालाची दिशा अवलंबून आहे. दुसरीकडे विद्यमान खासदारकी पदरी असलेल्या शिवसेनेत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे असतानाही हा पक्ष उमेदवार निवडीत चाचपडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेनेतील निष्ठावंत गट आहे; तर आ. सावंत यांचा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा आहे. त्यांनी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे नाव पुढे केले आहे. पाच वर्षांत खा. गायकवाड यांचा मतदारसंघात संपर्क नसल्याने शिवसैनिकांत काहीशी नाराजी आहे. सध्या तरी प्रा. गायकवाड यांचेच नाव उमेदवारीसाठी चर्चेत असले तरी त्यात बदलही होऊ शकतो, असा सेनेतील एका गटाचा दावा आहे. युती नाहीच झाली तर भाजपकडून आ. सुजितसिंह ठाकूर, प्रतापसिंह पाटील ही नावे असतील. बहुजन वंचित विकास आघाडीची ताकद मर्यादित असल्याने त्यांचा फारसा प्रभाव निवडणुकीवर जाणवणार नाही, असे चित्र आहे.

2014 च्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मत

रवींद्र गायकवाड, शिवसेना     6,07,699

पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी      3,73,374

(2014 च्या निवडणुकीत एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.)

विधानसभा मतदारसंघनिहाय आमदार

उस्मानाबाद : राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)     

परंडा  : राहुल मोटे (राष्ट्रवादी) 

तुळजापूर : मधुकरराव चव्हाण (काँग्रेस)     

उमरगा : ज्ञानराज चौगुले (शिवसेना) 

औसा  :  बसवराज पाटील (काँग्रेस)     

बार्शी :   दिलीप सोपल (राष्ट्रवादी)