Sun, Jul 05, 2020 15:28होमपेज › Marathwada › भाजपच्या विजयाची गुढी उभारा : क्षीरसागर

भाजपच्या विजयाची गुढी उभारा : क्षीरसागर

Published On: Apr 05 2019 7:27PM | Last Updated: Apr 06 2019 12:59AM
बीड : प्रतिनिधी  

योग्य वेळी योग्य वाटा तयार होतील, त्यावेळी कोणत्या पक्षात जायचे हे ठरवू, असा पक्ष प्रवेशाचा सस्पेन्स कायम ठेवत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी देशाला नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाची गरज आहे, त्यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि डॉ. प्रीतम मुंडे यांना खासदार करण्यासाठी भाजपाच्या विजयाची गुढी उभारा, असे आवाहन आपल्या समर्थकांना केले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. 

दोन वर्षांपासून राष्ट्रवादीने दुर्लक्षित केलेल्या क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे निश्‍चित करण्यासाठी शुक्रवारी  येथे समर्थकांची बैठक घेतली. त्या निमित्त शक्तिप्रदर्शन करत दोन वर्षांच्या पक्षांतर्गत घुसमटीला मोकळी वाट करून दिली. क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात आम्ही राष्ट्रवादी वाढवली. जिथे शाखा नव्हत्या, ज्या गावात येऊ दिले जात नव्हते, अशा गावांत जाऊन शाखा स्थापन केल्या. जिवाचे रान करून राष्ट्रवादी पक्ष वाढवला. राष्ट्रवादीने जो उमेदवार दिला त्याचे प्रामाणिक काम केले. जयसिंगराव गायकवाड यांनासुद्धा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणले. पक्षासाठी एवढे योगदान देऊनही दोन वर्षांपासून अनेक पक्ष फिरून आलेले लोक मालक झाले. राष्ट्रवादी पक्ष वाढवणारांनाच त्यांनी घरातून बाहेर काढण्याचा चंग बांधला. बाहेर पडण्याची आमची इच्छा नव्हती, मात्र ढकलत ढकलत दारापर्यंत आणले. खूप संयम दाखवला, खूप सहन केले. मात्र, आता सहन होत नाही. संयमाचा बांध आता फुटला आहे. संयमी असलो तरी कमजोर नाहीत हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे.

या वेळी त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित समर्थकांना लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. 

1999 मध्ये शरद पवारांना दिली होती मोठी ताकद

शरद पवार यांनी काँग्रेसधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर दिवंगत केशरकाकू आणि जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पवारांना मोठी ताकद दिली होती. दरम्यानच्या काळात  राज्याचे ऊर्जा मंत्री, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तसेच प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळ उपनेते अशी पदे त्यांनी उपभोगली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. 2014 मध्ये मोदी लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते. 

...तेव्हा तरी नेत्यांचे डोळे उघडायला हवे होते

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लातूर- बीड- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेत्यांनी उभे केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतली. राष्ट्रवादीकडे 200 मते अधिक असतानाही 80 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. यावेळी पक्ष नेतृत्वाचे डोळे उघडतील असे वाटत होते, असे सांगून धनंजय मुंडे हे विरोधीपक्षनेते नसून पक्षविरोधी नेते असल्याचा टोला त्यांनी मारला. राष्ट्रवादी पक्षाच्या केवळ नावातच राष्ट्रवाद आहे. खरा राष्ट्रवाद नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिला आहे, अशी सडकून टीका देखील मेळाव्यात जयदत्त क्षीरसागर यांनी केली.