Sat, Jan 23, 2021 05:58होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीला धक्का; रमेश कराड यांची पिछेहाट; अशोक जगदाळेंना उमेदवारी

राष्ट्रवादीला धक्का; रमेश कराड यांची पिछेहाट;अशोक जगदाळेंना उमेदवारी

Published On: May 07 2018 3:24PM | Last Updated: May 07 2018 3:59PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशीच भाजपने केलेल्या या खेळीचा राष्ट्रवादीला धक्‍का बसला आहे. 

कराड हे बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक होते. या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा होती. अखेरीस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले राज्यमंत्री सुरेश धस यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्यामुळे नाराज झालेल्या कराड यांना धनंजय मुंडे यांनी आपल्या जाळ्यात ओढले आणि उमेदवारीही दिली. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी प्रचारात उडी घेतली होती; पण गेल्या दोन दिवसांपासून कराड नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आ. अमरसिंह पंडित यांनी कराड यांचे निवासस्थान गाठून चार तास प्रतीक्षा केली. प्रतीक्षेत असलेल्या आमदार पंडित यांनी पाठ फिरविताच कराड यांनी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला.

भाजपच्या या खेळीने राष्ट्रवादीचे नेते चक्रावले आहेत. कराड यांनी का माघार घेतली असावी, सत्तेचा वापर करून भाजपने त्यांच्यावर दबाव आणला का, इत्यादी प्रश्‍नांची उत्तरे राष्ट्रवादीचे नेते शोधत आहेत. तर कराड यांचे सुमारे 40 ते 50 कोटी रुपये व्यवसायामध्ये अडकले आहेत. त्यांचा व्यवसाय भाजपच्या नेत्यांसोबतच असल्यामुळे रक्‍कम अडकण्याच्या भीतीने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असावा, अशीही चर्चा सुरू आहे.

कराड यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या मतदार संघात धस आणि अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 21 मे रोजी मतदान, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. राष्ट्रवादीने आता जगदाळे यांना पाठिंबा दिला आहे. तेच आमचे उमेदवार असतील, अशी माहिती धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी दिली. इतकेच नाहीतर मतांचे गणित आमच्या बाजूने जुळत असल्यामुळे जगदाळेच विजयी होतील, असा दावाही या नेत्यांनी केला. बीड-लातूर-उस्मानाबाद ही जागा मूळ काँग्रेसची होती. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेसने हक्‍क सांगून ती पदरात पाडून घेतली होती.

Tags :  NCP, Ramesh Karad, vidhanparishad 2018, election, nomination