Fri, Jun 05, 2020 17:05
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › परभणी : लिपिक पदांसाठी अर्ज भरला २०१४ साली आणि परीक्षा प्रवेश पत्र आले २०२० मध्ये!

परभणी : लिपिक पदांसाठी अर्ज भरला २०१४ साली आणि परीक्षा प्रवेश पत्र आले २०२० मध्ये!

Last Updated: Feb 14 2020 4:00PM
परभणी : प्रतिनिधी 

तब्बल पाच वर्षांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास वरिष्ठ लिपिक परीक्षा घेण्याची जाग आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये विद्यापीठाच्या अनास्थेचा फटका बसला. विविध पदांसाठी २०१४ मध्ये अर्ज भरून घेण्यात आले होते. मात्र या पदांची परीक्षा घेण्याचा साक्षात्‍कार विद्यापीठाला तब्‍बल सहा वर्षांनी झाल्‍याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अधिक वाचा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; नवलखा, तेलतुंबडेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

या विषयी सविस्तर माहिती अशी की, सन 2014 मध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विविध वर्गांच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुशिक्षित बेरोजगारांकडून विविध पदांसाठी अर्ज भरून घेतले होते. विशेष बाब म्हणजे बेरोजगारांतर्फे डीडी सुद्धा उमेदवारी अर्जा सोबत मागवण्यात आले होते. आपले शिक्षण पूर्ण करून बसलेल्‍या या बेरोजगारांनी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगले होते. 

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बेरोजगार युवकांनी रात्रंदिवस अभ्यास केला होता. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परिक्षा घेईल आणि आपणास नोकरी भेटेल या आशेने या युवकांनी स्वप्न रंगविली होती. पण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या भोंगळ कारभारामुळे आणि अनास्थेमुळे विद्यापीठाने फॉर्म भरून घेउन देखील परिक्षा घेतलीच नाही. वेळोवेळी या विषयी प्रत्यक्ष संबंधित प्रशासनाला विचारणा केल्यानंतर ही कोणतेही समाधानकारक उत्तर बेरोजगारांना देण्यात आलेले नव्हते. मात्र तब्बल पाच वर्षा नंतर या बेरोजगारांची परीक्षा घेण्यासाठी आत्ता 2020 मध्ये विद्यापीठाला साक्षात्कार झाला आहे.

अधिक वाचा :शरद पवारांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काय म्हणाले?

त्यावेळी सन 2014 मध्ये विविध पदासाठी अर्ज भरून घेतलेल्या उमेदवारांना पोस्टाद्वारे 16 फेब्रुवारी 2019 रोजी वरिष्ठ लिपिक या पदाच्या परीक्षा घेण्याच्या उद्देशाने परीक्षेचे प्रवेश पत्र पोस्टाद्वारे पाठवण्यात आले. या भोंगळ कारभारामुळे बेरोजगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरलेला आहे, कारण सदर विद्यापीठ तब्बल पाच वर्षांनी परीक्षा घेत असल्यामुळे कित्येक परीक्षार्थींची परीक्षेसाठी आवश्यक असलेले वय, मर्यादा ओलांडली आहे. त्‍या मुळे या गोष्‍टीला जबाबदार कोण असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांमधून पुढे येत आहे.

कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षा गुलदस्त्यात

पाच वर्षांपूर्वी भरून घेतलेल्‍या उमेदवारी अर्जांमधून फक्त या महिन्याच्या 16 तारखेला फक्त वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षा होत असून, त्याकाळात भरून घेतलेल्या कनिष्ठ लिपिक परीक्षेबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कोणताही खुलासा अद्याप केलेला दिसून येत नाही. परिणामी कनिष्ठ लिपिक पदाच्या उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, कनिष्ठ पदाच्या परीक्षाही तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी कनिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज भरलेल्या उमेदवारांमधून होत आहे. 

अधिक वाचा : भागवत कथा सांगायला येऊन विवाहितेला पळवून नेलेल्या महाराजाचा खुलासा

परीक्षेचे निकाल वेळेत लावून कनिष्ठ लिपिक वर्गीय परीक्षा तात्काळ घ्या : आ. मेघना बोर्डीकर 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने यापूर्वी म्हणजे पाच वर्षांपूर्वी विविध पदासाठी उमेदवारी अर्ज भरून घेतलेले असताना तब्बल पाच वर्षांनी परीक्षा घेणे ही विद्यापीठाची अनास्था दिसून येत आहे. एकाच वेळी सर्व परीक्षा घेणे अपेक्षित असताना फक्त फेब्रुवारीच्या 16 तारखेला वरिष्ठ लिपिक पदाच्या परीक्षा सदर विद्यापीठ घेत असल्याने पाठवलेल्या प्रवेश पत्रावरून स्पष्ट होते, तर मग त्याचवेळी कनिष्ठ लिपिक पदासाठी भरलेल्या उमेदवारांची परीक्षा विद्यापीठ कधी घेणार हा प्रश्न पुढे येत आहे. घेत असलेल्या परीक्षेचे निकाल त्वरित लावून बेरोजगाराना त्वरित न्याय द्यावा. परीक्षा घेण्यासाठी पाच वर्ष लागले तर मग निकाल लावण्यासाठी किती कालावधी घेण्यात येईल हा प्रश्न निर्माण झाला असून, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने उर्वरित अन्य वर्गीय परीक्षा तात्काळ घेऊन बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी शेलू विधानसभेच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दैनिक पुढारी शी बोलताना व्यक्‍त केली.

अधिक वाचा : 'व्हॅलेंटाईन डे'ला विद्यार्थिनींनी घेतली प्रेमविवाह न करण्‍याची शपथ

या वेळी विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा घेण्यासाठी लावलेला कमालीचा पाच वर्षाचा विलंब हा बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला असून, लागलेल्या विलंबामुळे ज्या उमेदवाराचे वय संपलेले आहे, त्यास जवाबदार कोण असा प्रतिप्रश्न आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला. परीक्षा उशिरा घेण्या बाबतची विद्यापीठाच्या अनास्थेची तक्रार मुख्यमंत्री कृषिमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.