Thu, Jul 16, 2020 00:15होमपेज › Marathwada › कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीला मानोलीच्या शेतकरी दांपत्याची उपस्थिती

कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीला मानोलीच्या शेतकरी दांपत्याची उपस्थिती

Published On: Jun 25 2019 3:42PM | Last Updated: Jun 25 2019 3:16PM
मानवत : प्रतिनिधी

भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या कृषी मूल्य आयोग पश्चिम विभागाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली या ग्रामीण भागातील सुनंदा शिंदे व मदनराव शिंदे या शेतकरी दाम्पत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीत रब्बी पीक 2020 व 2021 चे किंमत धोरण ठरविण्याचा दृष्टीने चर्चा व विनिमय करण्यात आला असून शिंदे दाम्पत्यानीही आपले मत या बैठकीत मांडले. 

कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने कृषी मूल्य आयोगाच्या पश्चिम विभागाची बैठक भोपाळ येथील मिंटो इंटरनॅशनल कॉन्व्हेंशनल सेंटर येथे मागील आठवड्यात झाली. या बैठकीस मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, दादर नगर हवेली, दमण-दिव या 8 राज्यातील शेतकरी प्रतिनिधी व या विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृषी लागत व मूल्य आयोगाचे विभागप्रमुख व मुख्य सल्लागार डी. के. पांडे यांनी सदरील बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महाराष्ट्रातून शेतकरी प्रतिनिधी म्हणून 2017 साली केंद्राचा जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार प्राप्त मानोली येथील सुनंदा शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या अनुषंगाने सुनंदाबाई शिंदे व त्यांचे पती, शेतकरी संघटनेचे नेते मदन महाराज शिंदे या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी आपले मत मांडले. या बैठकीस कृषी व किसान कल्याण मंत्रालयाचे अजित केसरी, प्रभान्शू कमाल, विजयलाल शर्मा, मध्य प्रदेश चे कृषी मंत्री सचिन यादव यासह अनेक अधिकारी उपस्थित होते .

या बैठकीत शिंदे दाम्पत्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडली. गेल्या 10 वर्षात शेतीचे उत्पादन खर्च वाढले असून यामध्ये मजुरी, बी बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खते, फवारणी औषधी, याचा समावेश असल्याचे सांगत अनियमित व अनिश्चित पाऊस, वादळ वारे, गारपीट, पिकावरील कीड, बोगस बियाणं यामुळे कमी झालेले शेतीउत्पादन व त्यातुलनेत शेतीमालाला कमी मिळत असलेला भाव याबद्दल सविस्तर माहिती देत शासनाने योग्य दामासह नवनवीन तंत्रज्ञान व नवीन किडरहित बी बियाणे देण्याची मागणी केली. तसेच शेतकरी हा असंघटित, व बेसहारा असल्याचे सांगितले. तसेच सर्व शेतकरी वर्गाचे जीवनमान उंचावून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीमालाला योग्य भाव देऊन मालाच्या विक्रीमध्ये दलाल व आडते यांना हटवले पाहिजे असे सांगत शासनाने मोफत पीकविमा देऊन शेतमाल निर्यात करण्याचे स्वात्रंत्य द्या, अशी मागणी या बैठकीत केली