Sun, Oct 25, 2020 08:36होमपेज › Marathwada › नांदेड : कोरोनामुळे श्रीदत्त नामाच्या जयघोषास माहूरकर मुकणार

नांदेड : कोरोनामुळे श्रीदत्त नामाच्या जयघोषास माहूरकर मुकणार

Last Updated: Jul 04 2020 2:56PM

माहूर येथील श्री दत्तात्रय महाराज मंदिरांतील पालखीमाहूर (नांदेड ) : पुढारी वृत्तसेवा 

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरुः देवो महेश्वरा !
 गुरु शाक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरुवे नमः !!

जगतगुरु श्री. दत्तात्रेय स्वामींचे जन्मस्थान व निद्रास्थान असल्याने दरवर्षी गुरु पौर्णिमेचे (आषाढी) औचित्य साधून मोठया संख्येने भाविक माहूरगडावर येऊन श्री दत्तशिखर, श्री अनुसयामाता व श्री रेणुकामाता मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतात. तर श्री दत्तात्रेय स्वामीं, श्री अनुसया माता, श्री रेणुकामातेचे दर्शन व  प. पु. प. म. श्री मधूसूदन भारती महाराज, प. पु. प. म. मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांचेसह मठाधिश व संत-महात्म्यांचे ही भाविक आशीर्वाद घेतात. यावर्षी मात्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने भाविकांसाठी अनिश्चित काळासाठी सर्वच मंदिरे बंद (धार्मिक विधीसह )करण्याचे आदेश दिल्याने दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री दत्तात्रेय महाराज की जय व साधू संतांच्या नावाच्या अविरतपणे चालणाऱ्या जयघोषाला भक्त मंडळीसह माहूरकर मुकणार आहेत.

वाचा : बीड : गावठी पिस्तूलासह दोघांना पकडले

गुरु पौर्णिमेला (५ जुलै) श्री. दत्तशिखर संस्थानचे प. पु. प. म. मधूसूदनजी भारती महाराजांचे सकाळी ७ वाजता मंदिरात आगमन होते. तिथे श्रीदत्त प्रभूच्या मूर्तीला अभिषेक घातल्या नंतर मंदिर परिसरातील महंतांच्या सर्वच समाध्यांचे पूजन करून ते मंदिर सभागृहातील परंपरागत गादीवर विराजमान होतात. त्यानंतर त्यांचे शिष्य वासुदेवजी भारती महाराज (मुख्य पुजारी ), हरिहरजी भारती महाराज, धनराजजी भारती महाराज, चिरंजीवजी भारती महाराज, चिंतामणजी भारती महाराज, जीवनजी भारती महाराज, शिलानंदजी भारती महाराज व इतर महापुरुष त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पमाला अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतात. यावेळी विश्वस्त मंडळीही उपस्थितीत असतात. हा सर्व विधी सकाळी ९ वाजेपर्यंत चालतो. तसेच महानुभाव पंथियांचे महास्थान असलेल्या श्री. देवदेवेश्वर मंदिरात प्रातःकाळी प. पु. प. म. श्री मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांच्या  प्रमुख उपस्थितीत मूर्तीला मंगल स्नान व ऊटी करण्यात येते. त्यानंतर विडा- अवसर अर्पण केल्या जातो. दुपारी १२ वाजता आरतीनंतर नैवद्य दाखविला जातो. दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत, महंत, वासनिक, नामधारक भक्त मंडळी देवपूजा व प्रसाद वंदन करतात. याप्रसंगी अखंड नामस्मरण व भगवत गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण केले जाते.

वाचा :'सत्ता स्थापनेपासून मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष'

वरील सर्व धार्मिक विधी फक्त नियमितच्या पुजाऱ्यामार्फत केल्या जाणार असून  शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयीन प्रमुख अॅड. सुदर्शन देशमुख यांनी दिली आहे. गेल्या चार महिन्यापासून मंदिर पूर्णतः बंद असल्याने मंदिरा जवळील धार्मिक साहित्य विकणा-या व्यापा-यांसह परिसरातील फुल बागाच्या मालकाची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. 

हे दत्त गुरु महाराज सुखाचा दानी |
नांदतो सह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ||
ऋषि अत्रि पिता अनसूया जयाची जननी |
तो पूर्णब्रह्म अवतार व्यक्तला अवनी ||
अति शुभ्र उटी  चंदनाची परिमळ भरूनी |
रेखीला टिळामृत नाभिज मिश्रीत करुनी ||
तू प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा |
तव पदी ठाव नित्यानी प्रभुवरा  ||
मागतो तुला निर्वाणी प्रभूवरा |
हे भक्त वत्सला ज्ञान धनाचा तरणी||
अज्ञान तमी करी प्रकाश तव तेजानी |
हे दत्त गुरु महाराज सुखाचा दानी ||
नांदतो संह्याचळ स्थळ निर्मळ पाहूनी !!!

 "