Sat, Oct 24, 2020 23:07होमपेज › Marathwada › माहूरच्या रेणुका मातेची दुसऱ्या माळेला पारंपरिक अलंकारात पूजा 

माहूरच्या रेणुका मातेची दुसऱ्या माळेला पारंपरिक अलंकारात पूजा 

Last Updated: Oct 18 2020 4:46PM
माहू्र  : प्रतिनिधी

आश्विन शुद्ध द्वितीयेला म्हणजेच आज (दि.18) दूसऱ्या माळेला श्री रेणुकामातेला पंचामृत स्नान घालण्यात येऊन वेद मंत्राच्या उच्चारात अभिषेक करण्यात आला. या नंतर देवीला सिंदूर लेपन करण्यात आले. पारंपारिक अलंकाराने मातेचा शृंगार करण्यात आला. आज मातेला पिवळे महावस्त्र चढवून खण,नारळ व फळांनी तिची ओटी भरण्यात आली. यानंतर घटांचे पूजन करून दूसरी माळ चढविण्यात आली. 

पुजारी भवानीदास भोपी,शुभम भोपी,संभाजी भोपी,आश्विन भोपी,समीर भोपी,अमित भोपी,चंडीकादास भोपी,उज्वल भोपी व पवन भोपी यांनी पायसाच्या नैवद्याची पहिली आरती केली. त्यानंतर पूरण पोळीचा नैवद्य अर्पण करून  परिसरातील देवी -देवतांची पूजा केल्या नंतर  छबीना फिरवून महाआरती करण्यात आली. या नवरात्र महोत्सवात भाविकांची अनुपस्थिती मनाला वेदना देणारी व कोरोना विषाणुची भीषणता प्रकट करणारी आहे.   

दरवर्षी लाखो भाविकांनी मंदिर फुलले असायचे, या वर्षी मात्र भाविकांची रांग लावण्यासाठी उभारलेल्या कठड्यावर माकडांनी ताबा केल्याचे चित्र पाहून मनाला रुख- रुख वाटत होती. दरवर्षी नवरात्र काळात खण, नारळ, ओटी, प्रसाद, धार्मिक साहित्य, खेळणी व बांगड्याच्या विविध रंगांने  नटलेली दुकाने पाहून मन प्रसन्न होई, या नवरात्रात मात्र व्यापा-यांचे रडकुंडीला आलेले चेहरे पाहून मन खिन्न होत आहे. मंदिराच्या पायथ्याशी माहूर येथील पेंटर सुरेश आराध्ये यांनी कोरोनावर मात करणाऱ्या  शक्तीची साकारलेली रांगोळी आज लक्षवेधी ठरली.

उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख व त्यांच्या सहकाऱ्यांनी  बॅरिकेट्स उभारल्याने भाविकांना शहरातील दत्त चौकातूनच ( टी पॉईंट ) मातेला वंदन करावे लागत आहे.

 "