Tue, May 26, 2020 16:19होमपेज › Marathwada › परळीत भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले

परळीत भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले

Last Updated: Feb 17 2020 3:10PM
बीड : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने पन्नगेश्वर शुगर मिल्स पानगाव या कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी थकीत ऊसाचा हप्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी आजपासून (ता.१७) चेअरमन पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थाना समोर आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जमा झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वेळीच हस्तक्षेप केला व वातावरण निवळले.

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन यशश्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 2018-2019 च्या ऊस गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पन्नगेश्वर कारखान्याला ऊस घातला होता. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस बिल दिलेले नाही याबरोबरच पन्नगेश्वर शुगर मिलने ऊस तोड मुकादम ,ऊसतोड वाहतूक मुकादम यांची सुध्दा बाकी थकविली असुन कारखान्याचे कर्मचारी यांचे पगार सुध्दा थकवलेले आहेत .

या सर्व पगारापोटी सहा कोटी रुपये कारखाने थकवले आहेत. या प्रश्नावर पन्नगेश्वर शुगर मिल्स समोर 14 सप्टेबर 2019 रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्याच्या उपचेअरमन व संचालक मंडळाने लवकरात लवकर राहिलेले 290 रुपये त्याप्रमाणे ऊस बिलाची रक्कम देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. तरीसुद्धा याची पूर्तता झाली नाही. म्हणून परळी येथील कारखान्याच्या चेअरमन यांच्या यशश्री निवासस्थानासमोर शेतकर्‍यासह आमरण उपोषणास बसणार आहोत असे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे,यांच्यासह मनसे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस ,राजेंद्र मोटे, वैभव काकडे, श्रीराम बादाडे, बाळासाहेब मुंडे ,परळी तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर,आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. 

या पार्श्वभूमीवर आज मनसे कार्यकर्ते यशश्री निवासस्थानासमोर आंदोलन सुरू करणार होते. मात्र, निवासस्थानापासून काही अंतरावर असतानाच समोरुन मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते जमा झाले. या ठिकाणी दोन्ही बाजुंनी प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. काही काळ वातावरण तणावपूर्ण बनत चालले होते पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वेळीच हस्तक्षेप केला व वातावरण निवळले.