शासकीय तंत्रनिकेतनेचे पालकत्व आमदार बोर्डीकरांनी स्वीकारले

Last Updated: Aug 13 2020 4:39PM
Responsive image
आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर


जिंतूर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय विद्यालयाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली असून त्या अनुषंगाने आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सर्व तंत्रनिकेतनच्या संबंधित प्राध्यापक व वरिष्ठांशी संवाद साधत सखोल चर्चा करत विविध प्रश्नांची सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी त्यांनी जिंतूरच्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश घ्यावा असे आवाहन करत भविष्यात येणाऱ्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया दिली.

तसेच या कॉलेजचे आपण स्वतः पालकत्व घेत असल्याचे जाहीर करत सुखद धक्का दिला. प्राध्यापकांनी विविध समस्या व असुविधे बाबत प्रश्न मांडले या वर सर्व प्रश्न उणिवा सोडवण्याची हमी आ.बोर्डीकर यांनी दिली. या वेळी प्राचार्य हेमंत तासकर, डॉ. एल. एस. बोथरा (ठाणे), विभाग प्रमुख डॉ. के. बी. लाढानी, डि.एस. बारबोले, व ए. के. राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गत वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये : बोर्डीकर

गत वर्षी विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात प्रवेश घेतल्याचे उघड झाले होते. तशी पुनरावृत्ती होऊ न देता प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. आधुनिक तंत्रशिक्षणाचे एकमेव दालन प्रवेशाअभावी बंद पडू नये, यासाठी आपण स्वतः यावर लक्ष केंद्रित करत गुणवत्ता वाढी प्रयत्न करणार व पालकत्व स्वीकारत असल्याची हमी बोर्डीकर यांनी दिली.