Sat, Aug 08, 2020 03:34होमपेज › Marathwada › विधान परिषद निवडणूक उमेदवारीसाठी ओबीसी फॅक्टरचा दबावतंत्राचा वापर

विधान परिषद निवडणूक उमेदवारीसाठी ओबीसी फॅक्टरचा दबावतंत्राचा वापर

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:42AMपरभणी : दिलीप माने

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊन 8 दिवस लोटले. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याच प्रमुख पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे मतदारांमध्ये चल-बिचल सुरू झाली आहे. उमेदवार कोण येणार? किती उमेदवार उभे राहणार? कोणते उमेदवार काय-काय देणार? अशी चर्चा मतदारांमध्ये होताना दिसत आहे. पक्षाकडून उमेदवार देताना जातीचे समीकरण जोडले जात असून एका गटाने ओबीसी फॅक्टर लावून धरला असून ओबीसी असेल तर आम्ही त्या उमेदवाराला मदत करू, अशी काही नेत्यांनी पक्षातील प्रमुखांना ठणकावून सांगितल्यामुळे नेत्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

यामुळे जातीनिहाय उमेदवार रिंगणात येतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी आता शिवसेनेही भाजपला टक्कर देण्यासाठी आपला स्वतंत्र उमेदवार परभणी-हिंगोली मतदारसंघामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मागणार्‍यांचे लक्ष विचलित झाले आहे. कारण शिवसेनेकडून येणारा संभाव्य उमेदवार विप्लव बाजोरिया हे राहणार असल्यामुळे या उमेदवाराचे वडील अकोला येथील शिवसेनेचे विद्यमान आ.गोपीकिशन बाजोरिया असून ते मोठे उद्योगपती असल्याने मतदारांना रसद पुरवायला ते कमी पडणार नाहीत. यामुळे भाजपच्या उमेदवारांमध्ये चल-बिचल सुरू झाली.

दुसरीकडे जातीचे समीकरण पुढे करून उमेदवार देण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून चालवला असल्याचे दिसू लागले आहे. यामध्ये ओबीसी फॅक्टर उमेदवार मिळविण्यासाठी किती यशस्वी होतात? हे पाहावे लागणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी भाजपचे एक मंत्री व परभणी जिल्ह्याचे 2 आमदार आग्रही झाले आहेत. मात्र ओबीसी मतदारांची संख्या पाहिल्यास व जातीच्या समीकरणावर मतदान झाल्यास ओबीसी फॅक्टरला धोका पत्कारावा लागेल, असे या सर्व आकडेवारीवरून दिसते. 

उमेदवारीसाठी भाजपत सत्ता व गटातटाचा प्रयोग

भाजपकडून डॉ.प्रफुल्ल पाटील  व दिवंगत माजी आ.कुंडलिकराव नागरे यांचे सुपूत्र सुरेश नागरे हे इच्छुक आहेत. सुरेश नागरे यांच्या पाठीमागे जिंतूरचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर  मंत्री पंकजा मुंडे, आ.मोहन फड, आ.तानाजी मुटकुळे हे उमेदवारी मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहेत. तर डॉ. प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी संपर्कमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. अ‍ॅड. विजय गव्हाणे हे आग्रही  आहेत. वेळ पडल्यास मेघना साकोरे-बोर्डीकरही रिंगणात उतरू शकतात.

राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून महापालिकेचे माजी महापौर प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे घातले आहे. तर विद्यमान आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्याला उमेदवारी मिळेल या हेतूने मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.

पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे पक्ष विचार करेल

काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख हेही मतदारसंघ बदलून मिळाला तर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे काँग्रेस त्यांच्या उमेदवाराचा विचार करेल, अशी अपेक्षा त्यांना वाटते. देशमुख यांना इतर अनेक पक्षांनी उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले असले तरी देशमुखांनी पक्षाशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना ही जागा काँग्रेसला सुटल्यास उमेदवारी नक्की मिळेल.