Thu, Jul 02, 2020 11:41होमपेज › Marathwada › लातूर : व्यवस्थापन कोटा रद्द; गुणवत्तेनुसारच होणार शाहू महाविद्यालयातील प्रवेश 

लातूर : व्यवस्थापन कोटा रद्द; गुणवत्तेनुसारच होणार शाहू महाविद्यालयातील प्रवेश 

Published On: Apr 20 2019 6:14PM | Last Updated: Apr 20 2019 6:14PM
लातूर : प्रतिनिधी

गुणवत्तेच्या क्षेत्रात राज्यभर लौकीक असलेल्या येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेने प्रवेशासाठीचा व्यवस्थापन कोटा रद्द करून १००% गुणवत्तेच्या निकषावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीपासून राजश्री शाहू महाविद्यालयाचे अकरावी विज्ञानसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश गुणवत्तेवर होणार आहेत. संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील व सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जाधव म्हणाले,  राजश्री शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी सबंध महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात. विशेषता अकरावीसाठी जितक्या जागा उपलब्ध आहेत त्यापैकी ९५ टक्के जागा दहावीतील गुणवत्तेच्या निकषावर पूर्वीपासून भरल्या जात होत्या. शासनाच्या धोरणानुसार पाच टक्के व्यवस्थापन कोटा भरण्याचा पूर्ण अधिकार संस्थेकडे होता. त्यासाठी खासदार ,आमदार, मंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शिफारशी येत होत्या. त्या सर्वच अपेक्षा पूर्ण करणे शक्य नव्हते. परिणामी शिफारस पत्र देऊनही प्रवेश न मिळाल्याने अनेक जण नाराज होत असत. शिफारसी करणाऱ्यांचा संस्थेबद्दल आकारण गैरसमज होत असे.

एखाद्या मंत्र्याच्या भेटीला गेल्यास आमच्या शिफारशीवरून  प्रवेश देणे झाले नाही, असा सवाल कानावर पडत असे शिवाय याच कारणापोटी संस्थेच्या कायदेशीर कामांनाही अधिकारी फाटा देत असत. हे सारे टाळण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ५ टक्के व्यवस्थापन कोटा रद्द करण्याचा एकमताने निर्णय घेतला. 

प्रारंभीपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षण व पारदर्शक प्रवेश प्रक्रिया हे संस्थेचे धोरण राहिले आहे. त्याला अनुसरूनच हा निर्णय झाल्याचे जाधव म्हणाले. पत्रकार परिषदेला संस्थेच्या सर्व संचालकांची उपस्थिती होती