होमपेज › Marathwada › खंडोबा यात्रा महोत्सव : दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

खंडोबा यात्रा महोत्सव : दर्शनासाठी भाविकांची गर्दी!

Published On: Dec 14 2018 1:47AM | Last Updated: Dec 13 2018 10:03PM
परभणी : प्रदीप कांबळे

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात खंडोबा यात्रा महोत्सव झाला.  दोन दिवस चाललेल्या महोत्सवात खंडोबाच्या दर्शनासाठी  मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  दरम्यान नागदिवे (चंपाषष्ठी)च्या दुसर्‍या दिवशी  सायंकाळी 6.30 वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशांच्या गजरात खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पिवळ्या भंडार्‍याची उधळण करत सहभागी वारकरी भक्‍तांच्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने शहर दुमदुमले. 

दरवर्षी   नागदिवे (चंपाषष्ठी) सणाच्या दुसर्‍या दिवशी शहरातील धार रोडवरील खंडोबा मंदिर देवस्थान येथे यात्रा भरते.  प्रसंगी परभणीसह जिल्ह्यातील भाविकांसह नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात स्थायी झालेले परभणीकर 55 वर्षापासून मोठ्या भक्‍तीभावाने खंडोबाच्या यात्रेसाठी येतात. मोठ्या भक्‍तीभावाने दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात. नवसाला पावणारा खंडेराया अशी या खंडोबाची भक्‍तांमध्ये धारणा आहे. खंडोबाच्या भक्‍त वारकरी यांच्यासह भाविकांनी यावर्षी मार्गशीष (डिसेंबर)महिन्यातील अमावस्येला 7 डिसेंबर रोजी घटस्थापना करुन पाच दिवसाने 12 डिसेंबर रोजी नागदिवे (चंपाषष्ठी) साजरी केली. गुरुवारी (दि.13 डिसेंबर) रोजी  सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथून  खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणुक  शहरातील अहिल्याबाई होळकर चौक, धनगर गल्ली, मोठा मारोती, आझाद कॉर्नर, गांधी पार्क, क्रांती चौक, शिवाजी चौक, नानलपेठ चौक, शनिवार बाजार, अपना कॉर्नर मार्गे खंडोबा मंदिर येथे समारोप समारोप करण्यात आला.  दोन दिवस चालणार्‍या या यात्रा महोत्सवा निमीत्त जिल्हा प्रशासनाने  एक दिवस 13 डिसेंबर रोजी प्रशासकीय सुट्टी जाहिर केली होती. या सुट्टीचा आनंद द्वीगुणीत करत विद्यार्थी व पालक कर्मचार्‍यांनी यात्रेतील विविध क्रिडा स्पर्धा, कुस्ती स्पर्धेचा आनंद घेतला. 

यात्राप्रसंगी दर्शनासाठी आलेल्या  लहान मुलांनी यात्रेतील खेळणी, रात पाळण्यात बसून यात्रेचा आनंद लुटला.