उस्मानाबाद : प्रतिनिधी
कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. उठसूठ विरोधकांना मर्दुमकी शिकविणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रशासनावर दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्याची मर्दुमकी दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
पाटील म्हणाले की, ढवळे यांनी शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर व वसंतदादा बँकेचे अध्यक्ष भाजपा नेते विजय दंडनाईक या दोघांमुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले आहे. आत्महत्येस जबाबदार असलेल्या ओमराजे व दंडनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिस विलंब करीत आहेत. यामुळे उर्वरित 71 शेतकर्यांची मन:स्थिती बिघडू शकते.