Thu, Jan 28, 2021 07:25होमपेज › Marathwada › 'सत्ता स्थापनेपासून मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष'

'सत्ता स्थापनेपासून मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष'

Last Updated: Jul 03 2020 5:29PM

आ. विनायकराव मेटेबीड : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीची राज्यात सत्तास्थापना झाल्यापासून आजपर्यंत मराठा समाजाच्या प्रश्नांना सोडवले गेले नाही. मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी ७ जुलैला असताना राज्य सरकारने याबाबतच्या तयारीसंदर्भात बैठक सुद्धा घेतलेली नाही, सुनावणीसाठी असलेली तयारी वकील, प्रतिज्ञापत्र आदींबाबत कसलीच प्रतिक्रिया राज्य शासनाकडून अद्याप आलेली नसल्याचा गंभीर आरोप आ. विनायकराव मेटे यांनी केला.

चार दिवसांवर आलेली सुनावणी अन राज्य सरकारची याबाबत कसलीच नसलेली तयारी यावरून राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरक्षणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले तर यासाठी मराठा समाज सर्वस्वीपणे महाविकास आघाडीच्या सरकारला जबाबदार धरेल’ असा आरोपही शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी बीड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

वाचा : जालना : वैष्णवी गोरे खून प्रकरणी आरोपीस फाशी देण्याची मागणी

जे आरक्षणाचे घडत आहे तेच इतरही मराठा प्रश्नांबाबत सुरु आहे, सारथी संस्थेमध्ये सावळा - गोंधळ चालू आहे, याबाबत पुणे, मुंबई नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलने करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांना असलेल्या सवलती मिळत नाहीत की, त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, विविध योजना बंद केल्या आहेत, नेमकं या प्रश्नांबाबत हे सरकार अनास्था का दाखवत आहे. हे समजण्यास मार्ग नसल्याचे ते म्हणाले. या सरकारने मराठा समाजाचा एकतरी प्रश्न सोडवावा? आरक्षण, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांना मदत, कोपर्डीच्या बहिणीला न्याय, अण्णासाहेब पाटील महामंडळ यासह सारेच मराठा समाजाचे प्रश्न जशास तसेच आहेत, महायुतीच्या काळात या सर्व प्रश्नांची सोडवणूक करायला गती होती मात्र महाविकास आघाडीच्या काळात काहीही हालचाल होताना दिसत नाही.  

आ. विनायकराव मेटे यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कारभारावरून सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. अण्णासाहेब पाटील मंडळाकडेही या सरकारने लक्ष दिलेले नाही. एक पैसासुद्धा कुणाला दिलेला नाही, युवकांना हे सरकार नुसते नादी लावत आहे, लाखोंच्या संख्येने प्रस्ताव आले आहेत, मात्र कर्ज कुणालाच मिळालेलं नाही. याबाबत गंभीर होऊन कर्जप्रकरणे करण्याची मागणी केली मात्र त्यावरही लक्ष नाही, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून समाज याबाबत कधीही या सरकारला माफ करणार नाही. वरील सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अन्यथा शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल असा इशाराही आ. मेटे यांनी दिला.

वाचा : मराठवाड्यात संख्या 8,000 हजारांवर

’ह्या सरकारने झोपेचे सोंग घेतले असेल तर त्यांना जागं करावं लागेल’

आ. विनायकराव मेटे यांनी सरकारच्या या मराठा समाजाबाबत वावडे असल्यागत सुरु असलेल्या कारभाराचा समाचार घेताना सरकारला तात्काळ हे प्रश्न सोडवण्याची मागणी केली. सरकारने गांभीर्याने काही पाऊलं उचलली नाही, तर मग मराठा समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. झोपेचं सोंग घेतलं असेल तर त्यांना जाग करण्याचे काम शिवसंग्राम करेल, असा टोलाही आ. मेटे यांनी लगावला.

वाचा : परभणी : मास्क न वापरणाऱ्यांकडून १२ हजार दंड वसूल