होमपेज › Marathwada › वडिलांना न सांभाळणाऱ्या दुबई रिर्टन मुलाला दणका

वडिलांना न सांभाळणाऱ्या दुबई रिर्टन मुलाला दणका

Published On: May 22 2019 6:40PM | Last Updated: May 22 2019 6:40PM
हिंगोली : प्रतिनिधी

ज्या वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, अंगाखाद्यांवर खेळविले, पोटाला चिमटा देवून पै अन्‌ पै जमा करत शिक्षणावर खर्च केला. त्याच उच्चशिक्षित दुबई रिर्टन असलेल्या मुलाने म्हातारपणी वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकल्याने हिंगोली येथील उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी याप्रकरणी दंड सुनावला आहे. वडिलांच्या या अर्जावर निर्णय देताना वडिलांना प्रतीमहिना ७ हजार ५०० रूपये व राहण्यासाठी सर्व सुविधायुक्त एक खोली देण्यात यावी, असे आदेश अतुल चोरमारे यांनी दिले आहेत.

हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील यशवंत शिवाजीराव खडसे यांनी उपविभागीय अधिकारी तथा पिठासन अधिकारी हिंगोली ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला होता की, मी ६५ वर्षाचा असून मोलमजुरी करतो. पण, आता मला ते शक्य होत नाही. माझा मुलगा संजय यशवंत खडसे एमबीए झाला असून, त्याचे वार्षिक उत्पन्न दहा लाख आहे. माझी सून पौर्णिमा संजय खडसे एमबीए झाली आहे. (रा.ज्योतीनगर, आंबेडकर नगरच्या पाठिमागे हिंगोली)  पण, तो मला आता सांभाळत नाही. माझी प्रकृती ठिक नसल्यामुळे औषधोपचारावर होणारा खर्च मला आता परवडत नाही. त्यामुळे मुलगा व सुनेने मला दरमहा अन्न, वस्त्र, निवारा, औषध व इतर गोष्टीसाठी दहा हजार रूपये द्यावेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी अतूल चोरमारे यांनी मुलगा व सून यांना वेळोवेळी नोटीस दिली होती. मुलगा संजय याने १६ फेब्रुवारी २०१९ रोजी लेखी अर्जाद्वारे पुढील संधी देण्याची विनंती केली होती. मात्र, ते अनुपस्थित राहिले. 

यानंतर उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी यशवंत खडसे यांनी सादर केलेला अर्ज व युक्तीवादाआधारे काही निष्कर्ष काढून आदेश पारित केले आहेत. यामध्ये मुलगा यशवंत शिवाजी खडसे यांनी निर्वाह भत्ता म्हणून प्रतीमहिना ७ हजार ५०० रूपये वडिलांच्या खात्यावर किंवा मनीऑर्डरद्वारे नियमितपणे महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करावेत व तसे न्यायाधीकरणास कळवावे. तसेच वडिलांसाठी एक सुसज्ज खोली तात्काळ खुली करून द्यावी व त्यांना कोणताही त्रास देवू नये. वडिलांच्या नावावर हिंगोली येथील ज्योतीनगर येथे असलेला प्लॉट जबरदस्तीने ताब्यात घेण्यात येवू नये. या आदेशाचा प्रतिवादी मुलगा व सून यांनी अवमान केल्यास आई-वडिल ज्येष्ठ नागरीक यांचा अधिनियम २००७ तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

मुलगा दुबई रिटर्न

मुलगा संजय यशवंत खडसे हा एमबीए उच्च शिक्षित असल्यामुळे तो काही काळ नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास होता. त्यानंतर आपल्या उच्च शिक्षित पत्नीसोबत अमरावती येथे स्थायीक झाला असून, हे दोघेही अमरावती येथे नोकरी करीत आहेत. भारतात पित्याला परमेश्वराएवढे महत्व दिले जाते. पण, आरबी संस्कृतीचे वारे लागलेल्या या पुत्राने म्हातारपणी वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी झटकल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला दणका वठणीवर आणणारा आहे