बीड : दिनेश गुळवे
राज्यातील विकसित असणार्या भीमाशंकर, घृष्णेश्वर, शेगाव व पंढरपूर या देवस्थानप्रमाणे परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवस्थानचा विकास केला जाणार आहे. येथे भाविकांसाठी व्हीआयपी भक्तनिवास, सौरदीवे, गार्डन, दर्शन इमारत यासह विविध कामे करण्यात येणार आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या शंभर कोटींच्या विकास आराखड्यास जिल्हा स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. असे असले तरी या देवस्थानचा भीमाशंकर व घृष्णेश्वर प्रमाणे अद्यापही विकास झालेला नाही. त्यामुळे येथे येणार्या भाविकांना राहण्यासह इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे श्रावण महिना, महाशिवरात्री यासह इतर वेळीही भाविकांची मोठी गर्दी असते. येथे येणार्या भाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, देवस्थानचा विकास व्हावा, यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी 133 कोटी 59 लाख 19 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी बीड येथील विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भीमाशंकर, घृष्णेश्वर, शेगाव, पंढरपूर आदी देवस्थानला भेट दिली असून त्याप्रमाणे सोयी येथे निर्माण केल्या जाणार आहे. परळीत देशभरातून भाविक येतात, अनेकदा यामध्ये राजकीय वरिष्ट पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, उद्योगपती यांचा समावेश असतो. अशा व्हीआयपी नागरिकांना थांबण्यासाठी आता येथे भक्तनिवास बांधण्यात येणार आहे. यामध्ये चोवीस तास स्वच्छ पाणी, वीज, एसी आदी सुविधा असणार आहेत. यासह मंदिर परिसरात सर्वच ठिकाणी सौरदिवे बसविले जाणार आहेत. मंदिर परिसरात भव्य सभामंडप, व्यापार्यांना दुकानसाठी जागा, व्यापार केंद्र, पंढरपूरप्रमाणे दर्शन इमारत, पार्किंग व्यवस्था, प्रशस्त रस्ते, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थाप आदी कामे मंदिर परिसरात केली जाणार आहेत. यासाठीचा आराखडा जिल्हास्तरीय समितीने मंजूर केला असून तो नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर उच्चस्तरीय समिती व शिखर समिती या आराखड्यासाठी मंजुरीचे काम करणार आहे.
शहराच्या चारही बाजूने उभारणार कमान
परळी शहराच्या चारही बाजूने भव्य अशा कमानी तयार करण्यात येणार आहेत. दक्षीण भारतात अनेक ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी अशा कमानी आहेत. या कमानींप्रमाणेच परळीशहराच्या बाजुने चारही दिशांना भव्य कमान उभारण्यात येणार आहेत.
देवस्थान परिसरात भव्य गार्डन
शेगाव येथे येणार्या भाविकांसह पर्यटकांसाठी तेथे भव्य गार्डन उभे करण्यात आले आहे. परळी देवस्थानकडेही जवळपास दोनशे एकर जागा आहे. या जागेवर परळीमध्ये गार्डन तयार केले जाणार आहे. या गार्डनमध्येही अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
परळी येथे वैद्यनाथाचे मंदिर असल्याने हे शहर अगोदरच देशातील भाविकांच्या व पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. या ठिकाणी आता शेगाव, भीमाशंकर प्रमाणे विकासकामे झाल्यास या देवस्थानला येणार्या भाविकांसह पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे.
परळी येथील विकासासाठी 133 कोटींपेक्षा अधिक निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम खाते, वीज वितरण, नगरपालिका, पर्यटन विभाग आदी विभागांतर्गत परळी येथे कामे होणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. - बालाजी आगवाने, जिल्हा नियोजन अधिकारी, बीड.