Wed, Jul 08, 2020 15:15होमपेज › Marathwada › धान्य घोटाळ्यातील कारवाई रखडली

धान्य घोटाळ्यातील कारवाई रखडली

Published On: Feb 18 2019 1:14AM | Last Updated: Feb 18 2019 12:51AM
बीड: शिरिष शिंदे

अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्यावर एसीबीचा ट्रॅप पडण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना बीड येथील शासकीय धान्य गोदामातील अनियमिता संबंधित अहवाल सादर केला होता. त्यामध्ये 12 हजार 968 क्विंटल धान्य गोदामात कमी असल्याचे नमुद करत तीन कर्मचार्‍यांवर अनियमिततेचा ठपका ठेवला होता. मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई  झालेली नाही.
बीड येथील शासकीय धान्य गोदामामध्ये धान्याची तूट असल्याचे समोर आल्यानंतर या संदर्भात  चौकशी पथक  स्थापन  केले. सदरील समितीने दिलेल्या अहवालानुसार बीडच्या गोदामातील धान्य तूट संदर्भात समितीने बीडच्या तहसीलदारांना  7 व 21 सप्टेंबर 2018 आणि 23 ऑक्टोबर 2018 रोजी पत्र पाठवून गोदामातील अभिलेख तपासणीची मागणी केली होती, परंतु 1 फेब्रुवारी 2014 ते 13 ऑगस्ट 2014 व दि.14 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2015 या कालावधीमधील अभिलेख उपलब्ध होत नसल्यामुळे तत्कालीन सर्व गोदाम व्यवस्थापकांना नोटीस पाठवून खुलासे मागविले होते. 1 फेब्रुवारी 2014 ते 13 ऑगस्ट 2014, दि.14 ऑगस्ट ते 31 मार्च 2015 या कालावधीतील गोदामातील मूळ अभिलेखे व्यवस्थापकांनी उपलब्ध केले नसल्यामुळे धान्य वितरण नोंद वही नमुना एच च्या  छायांकित प्रती यावरून या कालावधीतील गोदाम व्यवस्थापकांनी केलेल्या अनियमिततेची तपासणी करण्यात आली. तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल झेंड व संजय हंगे यांच्या काळातील  हस्तांतरण यादीमध्ये  6 मार्च व 22 मार्च 2015 यामध्ये तफावत आढळून आली. म्हणजेच अतुल झेंड व संजय हंगे यांनी या कालावधीत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच या दोघांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन जवळपास 387357 रुपये किमतीचे 1 हजार 558.99 क्विंटल धान्यात अनियमितता असल्याचे आढळून आले. तत्कालिन व्यवस्थापक एम.टी.जाधवर यांच्या कालावधीत 3 ऑक्टोबर 2015 ते 31 डिसेंबर 2016 होता. या कालावधीमध्ये 238374 रुपये किमतीचे 112.5 क्विंटल धान्य उपलब्ध होते. त्यांनी प्राधान्य कुटुंब योजनेच्या धान्य वाटपाची बेरीज 6 नोव्हेंबर 2015 रोजी 363.63 क्विंटलने कमी देऊन साठा लेख्यात धान्याचा खर्च कमी नोंदवून अनियमितता केल्याचे म्हटले आहे तर तत्कालिन गोदाम व्यवस्थापक संजय हंगे यांनी डिसेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये साखरेच्या परमिटची दुबार नोंद घेऊन 573.44 क्विंटल साखरेची अनियमितता केली आहे. त्याची किंमत 14 5777.21 एवढी होती. दुसर्‍या गोदामातून काढलेल्या 4 हजार 822.69 क्विंटलच्या धान्य वितरणात अनियमितता केली आहे. प्रलंबित असलेल्या परमिट सक्षम प्राधिकार्‍याची परवानगी घेता स्वत:च्या अधिकार कक्षेत वितरण केले आहे. यामध्ये 1 हजार 658.2 क्विंटल एवढे वितरण करुन अनियमितता केली आहे. एका योजनेकडून दुसर्‍या योजनेकडे वरिष्ठांची परवानगीशिवाय धान्य वितरण केले आहे. बीड शासकीय धान्य गोदाम येथून एकूण 12 हजार 968.29 क्विंटल धान्य कमी आढळून येते असे अहवालात म्हटले आहे.