Fri, Jul 03, 2020 21:28होमपेज › Marathwada › सर्पमित्रांवर वनविभागाचा फणा

सर्पमित्रांवर वनविभागाचा फणा

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:27AMबीड : प्रतिनिधी

सापाचे विष स्वत:ला टोचून सर्पमित्राने बीड शहरात आत्महत्या केली. या घटनेची गंभीर दखल वन विभागाने घेतली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, सापांचे संरक्षण व्हावे, तस्करी होऊ नये, उपद्व्यापी सर्पमित्रांकडून सापांना व वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी वन अधिकारी अमोल सातपुते यांनी सोमवारी सर्पमित्रांची बैठक घेतली. यावेळी उपद्व्यापी सर्पमित्रांना ताकीद देण्यात आली. त्रासदायक सर्पमित्रांना कायद्याचा बडगा उगारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

बीड शहरातील एका लॉजमध्ये सर्पमित्राने विषाचे इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केली होती. या घटनेची गंभीर दखल वन विभागाने घेतली. जे सर्पमित्र सापांपासून नागरिकांना व नागरिकांपासून सापांना वाचवितात त्याच सर्पमित्राने असे पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे वन विभागाने जिल्ह्यातील सर्पमित्रांची सोमवारी दुपारी वन कार्यालयात बैठक बोलाविली होती. 
या बैठकीत वन अधिकारी अमोल सातपुते यांनी सर्पमित्रांना कायदा व वन्यजीव संरक्षण कायदा यांची माहिती दिली.  सर्पमित्र सिद्धार्थ सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यात एकाही सर्पमित्रांना वनविभागाने अधिकृत परवाना दिलेला नाही.

यानंतरही काही ठिकाणी सर्पमित्रांनी साप पकडला किंवा तसे आढळून आल्यास त्याची माहिती अगोदर वन विभागास देणे महत्त्वाचे असते. अनधिकृतपणे साप पकडणे, साप किंवा सापाच्या विषाची तस्करी करणे, सापाचे विष जवळ बाळगणे हे सर्व बेकायदेशीर असून असे प्रकार रोखण्यासाठीही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह आकाश गालफाडे, संदीप बालय्या, सिद्धार्थ पावले, निखिल सवाई, रोहन सवाई, संदीप सवाई, दयानंद ससाणे, हुंकेश सवाई, अमित भगत, राहुल सवाई, हमीद बेग, प्रकाश कदम, व्यंकटेश माने, बाप्पा कानडे, राहुल शिरसाट आदी सर्पमित्र उपस्थित होते. 

सर्पमित्रांची भीती

जिल्ह्यात काही उपद्व्यापी सर्पमित्र आहेत. समाजात त्यांची भीतीही आहे. असे सर्पमित्र साप पकडून त्याचे गावात किंवा शहरात प्रदर्शन करतात. साप हातात घेऊन नागरी वस्तीत मिरवून भीती निर्माण करतात. अशा सर्पमित्रांना यापुढे कायद्याचा बडगा दाखविणार असल्याचा इशारा अमोल सातपुते यांनी दिला. सापांचे संरक्षण व सापांपासून नागरिकांचे संरक्षण करावयाचे असल्यास शिवाय संकटात सापडलेल्या, जखमी झालेल्या वन्य प्राण्यास मदत करावयाची असल्यास याची माहिती अगोदर वन विभागास देणे गरजेचे असल्याचेही  त्यांनी सांगितले. 

बैठकीनंतर समिती स्थापन

वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या उपस्थितीत सर्पमित्रांची सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. ही समिती यापुढे उपद्व्यापी सर्पमित्रांना पायबंद घालणार आहे. यासह वन्य प्राणी संरक्षण कायद्याची माहितीही नागरिकांना देणार आहे.