Sat, Jul 11, 2020 21:27होमपेज › Marathwada › बीड : शेतकरी आत्महत्येचे भीषण सत्र सुरूच

बीड : शेतकरी आत्महत्येचे भीषण सत्र सुरूच

Last Updated: Nov 07 2019 5:47PM
बीड : प्रतिनिधी 

जिल्ह्यात गेल्या दोन दशकात दोन हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये यासाठी मानसोपचार, प्रेरणा प्रकल्प, उभारी अभियान यासारखे प्रकल्प राबविण्यात आले होते. एकीकडे असे प्रयत्न होत असले, तरी दुसरीकडे मात्र सततचा दुष्काळ, नापीकी व कर्जबाजारीपणा यातून शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची एक चिता विझत नाही, तोच दुसरा शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

कधी कोरडा तर ओला दुष्काळ असल्याने शेतकर्‍यांच्या गळ्याचा फास सुटण्याचे नाव घेत नसल्याचेही भीषण वास्तव समोर येत आहे. गेल्या ४८ तासांत बीड जिल्ह्यात तीन शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या केल्याने जिल्हा हादरून निघाला आहे. २०१९ या एका वर्षात जिल्ह्यात १६५ शेतऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

गेल्या दोन दशकांत 2006 साली शेतकरी आत्महत्येच्या आकड्याने शंभरी पार केली. यानंतर 2012 पर्यंत शंभरीच्या आतच शेतकरी आत्महत्येचा आकडा होता. मात्र, 2012 नंतर यात मोठी वाढ झाली, शेतकरी आत्महत्येच्या संख्येने कधी तिनशे (2015)चा आकडा गाठला तर 2015 नंतर कधी दोनशेच्या खाली आलाच नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात प्रेरणा प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प चांगला असला तरी ईथपर्यंत शेतकरी पोहचत नसल्याने अनेक घटना घडत आहेत. तर, काही घटना थोपविण्यास या प्रकल्पाला यशही आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी माहिती दिली. 

यासह तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी उभारी हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, त्यांची बदली होताच या प्रकल्पानेही गाशा गुंडाळल्याचे चित्र असून या प्रकल्पालाच उभारी देण्याची वेळ आली आहे. 2013 नंतर जिल्ह्यात दुष्काळाच्या फेर्‍याने फास आवळला आहे. शेतीवर झालेला खर्चही निघत नसल्याने तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळेच शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मत शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम गाडे यांनी व्यक्त केले. 

शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबवायचे असेल, शेतकर्‍यांना मजबूत बनवावयाचे असेल, आत्महत्येचा कलंक पुसावयाचा असेल तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, पीकांना हमीभाव द्या व सरसकट कर्जमाफी करा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांनी केली आहे. 

48 तासात तीन आत्महत्या

जिल्ह्यात 48 तासात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भोगलवाडी (ता. धारूर) येथील प्रभाकर साहेबराव मुंडे यांनी नापीकीने कर्ज कसे फेडायचे या चिंतेने आत्महत्या केली. तर, देवळा (ता. वडवणी) येथील रामा बापू शिंदे (वय 37) यांनी पीक वाया गेल्याने मुलीचे लग्न कसे करायचे? या विवंचनेतून व सात एकर क्षेत्रातील कांदा, कापूस वाया गेल्याने कुटुंब कसे चालवायचे? यातून आत्महत्या केली. तर, गुरुवारी पहाटे पारगाव शिरस (ता. बीड) येथील जयराम रामप्रसाद गव्हाणे (वय 30) या तरुण शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणा यातून गळफास लावून आत्महत्या केली. नापीकी, कर्जबाजारीपणा यातून तरुण शेतकरी आत्महत्या करीत असल्याने जिल्हाभरात शोकाचे वातावरण आहे.

शेतकर्‍यांनी अघटीत पाऊल उचलू नये

शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, यासाठीच्या उभारी प्रकल्पाची आपणास कल्पना नाही, मात्र शेतकर्‍यांच्या सोबत जिल्हा प्रशासन आहे, शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून शेतकर्‍यांना मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे  शेतकर्‍यांनी खचून न जाता अघटीत पाऊल उचलू नये. 
- अस्तिककुमार पांडे, जिल्हाधिकारी, बीड