Sat, Jul 04, 2020 07:21होमपेज › Marathwada › वाशीम : अतिक्रमणामुळे कुटुंबाची हतबलता; शिडी लावून जावे लागते घरात  (video)

वाशीम : अतिक्रमणामुळे कुटुंबाची हतबलता; शिडी लावून जावे लागते घरात (video)

Last Updated: Jun 05 2020 5:26PM
वाशीम : प्रतिनिधी 

शहरातील देवपेठ भागातील रोहिदास नगर येथील एका विवाहित महिलेच्या घरासमोर बळजबरीने केलेल्या अतिक्रमणामुळे सदर महिलेला आपल्या स्वत:च्याचं घरात शिडी लावून जावे लागत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. असे असताना दुसरीकडे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या अनेक निवेदनांवर नगर परिषदेकडून कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे नगर परिषद प्रशासन आणि अतिक्रमण हटाव पथकाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून थेट घरासमोरच झालेल्या अतिक्रमणामुळे महिलेची कोंडी झाली असून, यासाठी कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न सदर महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना पडला आहे.

अधिक वाचा : 'पंधरा दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा'

शहरातील रोहिदास नगर येथे सौ. शोभा धनराज राठी या विवाहित महिलेचे स्वमालकीचे राहते घर आहे. या घरात त्या आपले पती, दोन मुले व एका मुलीसह मोलमजुरी करून जगत आहेत. गेल्या चार महिन्याआधी तेथीलच मदन चिंतामण राठी, कन्हैया चिंतामण राठी, भिमराव नामदेव घुगे, संतोष भिमराव घुगे, कैलास भिमराव घुगे या पाच लोकांनी सदर महिलेच्या घरासमोरच अतिक्रमण केल्यामुळे या महिलेला आपल्या घरात जाण्यायेण्याचा मार्गचं बंद झाला आहे. 

अधिक वाचा : यूपीएससी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

शोभा राठी यांच्या शिट नं. ११३, प्लॉट नं. २९९६ क्रमांकाच्या घराच्या नमुना ड मधील नकाशात घरासमोरून पुर्वीपासून जाण्या येण्याचा रस्ता असल्याचा उल्लेख आहे. हा रस्ता गेल्या चार महिन्यापासून अडविला आहे. त्यामुळे महिला व तिच्या कुटुंबियांना स्वत:च्याच घरात जाणे - येणे कठीण झाले असून, घरात जाण्याकरीता किंवा पाणी भरण्यासाठी सुध्दा दुसर्‍याच्या घरावरून शिडी लावून येणे - जाणे करावे लागत आहे. घरासमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी शोभा राठी यांनी तीन वेळा नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले. परंतु या निवेदनावर नगर परिषदेकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. 

अधिक वाचा : चक्रीवादळातील पीडितांना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा, रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर 

दोन ते तीन वेळा अतिक्रमण पथकाने येवून केवळ पाहणी केली. परंतु अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे आपल्याच घरात जाण्या - येण्यासाठी शोभा राठी यांच्यावर प्रशासनाला याचना करण्याची वेळ आली असून, नगर परिषद कारवाई करत नसेल तर आपण न्याय कुणाला मागावा असा प्रश्न राठी यांच्यासमोर उभा राहिला आहे. अतिक्रमण हटविले नाही तर आपल्याला आत्मदहना शिवाय मार्ग उरणार नाही अशी भावना शोभा राठी यांनी व्यक्‍त केली आहे.