Tue, Jul 14, 2020 02:26होमपेज › Marathwada › स्वप्नातील गाव सत्यात उतरले

स्वप्नातील गाव सत्यात उतरले

Published On: Jul 02 2019 2:06AM | Last Updated: Jul 02 2019 2:06AM
लातूर : प्रवीण जगताप

अलगरवाडी लातूर नांदेड राज्यमार्गावर चाकूरपासून तीन किलोमीटरवर आहे. लोकसंख्या अडीच हजारांच्या घरात. गावात ग्रामपंचायतीची एक वर्षापुर्वी नऊ सदस्य बिनविरोध झाले. तर निवडणुकीतून सरपंच पदावर गोविंदराव माकणे विराजमान झाले. गावात मुख्य रस्ते काँक्रीटचे आहेत. डासांच्या पैदाशीस कारणीभूत असणार्‍या गटारीमुक्तीचे पहिले पाऊल उचलले. प्रत्येक घराजवळ चार बाय चार फुट आकाराचे खड्डे काढून सांडपाणी, धुण्याचे पाणी व वापराचे पाणी सोडण्यात येतेे. त्यामुळे गटारांच्या स्वच्छतेची देखभाल डासनिर्मिती  प्रश्‍नांवर जालीम इलाज त्यांनी काढला आहे.

गावात प्रत्येक गल्लीत सीसीटीव्ही बसवण्यात आला आहे.  पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचे युनिट असून पाच रूपयात वीस लिटर शुद्ध पाणी देण्यात येत आहे. तीन ठिकाणी कोल्ड पाण्याची सोय करण्यात आली आहे. पाच कुपनलिका खोदून पाच गल्ल्यात लहान टाक्या बसण्यात आल्या आहेत.

गावात प्रत्येकाच्या घरात शौचालय व त्यावर आकर्षक रंगरंगोटी व स्वच्छतेचे संदेश चित्रित केले आहेत. गावात स्वच्छतादुत आहेत. घंटागाड्या आहेत. ओला व सुका कचरा गावानजीक गोळा केला जात आहे. कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावता यावी म्हणून सात गुंटे जमीन घेऊन तेथे त्याचे विघटन शास्त्रोक्त रीतीने करण्यात येणार आहे. पावसाचे पाणीही गावालगत  साचू नये म्हणून बंदीस्त नाला काढण्याचे काम पावसाळ्याअगोदर नव्याने हाती घेतले असून ते गावाबाहेर नेले जाणार आहे. गावाला जलयुक्त करण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशननेही हात दिला असून जलसंधारणाचे काम सुरू झाले आहे.

गावातले उकीरडे घंटागाडीमुळे बंद होत आहेत तर जुन्या उकीरड्यांच्या जागी बागबगीचा साकरण्यात येत आहे. गावात पाण्याच्या टाक्यांच्या आवारातच साहित्यानिशी सुसज्ज अशी ओपन जिम साकरली आहे. त्याचा खर्च लाखोंच्या घरात आहे. सरकारी शाळेला सर्व बाजुंनी रंगकाम करून इलर्निंगसारख्या सुविधा आहेत. शाळेच्या इमारतीवरील पावसाचे पाणी मुरविण्यासाठी रेन हार्वेस्टींग करण्यात आले आहे. ग्रामपंचायत बनवले कार्यमंदीर : सरपंच गोविंदराव माकणे यांनी एक वर्षात विकासकामांचा सपाटा लावून कामे पूर्ण केली आहेत. पण आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक संस्था या सर्वांकडील शासकीय व मदतनिधीतून कामे पूर्ण केली. सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही खोल्या वातानुकुलित केल्या आहेत. लाईट गेली तरी इन्व्हर्टर व इंटरनेटने सज्ज करून ग्रामपंचायतीला कार्यमंदरी बनविले आहे.  तंटामुक्‍ती समिती अध्यक्ष धीरज माकणे, ग्रामसेवक प्रशांत राज, कंत्राटदार विठ्ठलराव माकणे, उपसरपंच अंजेराव खटके, गटविकासअधिकारी श्याम गोडभरले आदींचेही सहकार्य आहे.ग्रामसेवक प्रशांत राजे यांचे शिक्षण बीएसस्सी अ‍ॅग्री, एलएलबी आहे. त्यामुळे विकास आणि कायदा यांची कशी सांगड घालायची याचे गणित सापडले आहे.

दळण मोफत

ग्रामपंचायतीचे सारे कर वेळेत भरणार्‍याच्या घरात मोफत दळण देण्याचा निर्णयही  ग्रामपंचायतीने घेतला आहे. याशिवाय मोफत आरोग्य उपचार, विविध कार्यशाळा, महिला बचतगट आणि असंख्य उपक्रम गावात सुरू आहेत.

स्मार्ट ग्रामचे मिळाले पन्नास लाखांचे बक्षीस

तालुका स्मार्ट ग्राम योजनेत दहा लाख रूपयांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर जिल्हा स्मार्ट ग्राममध्येही पन्नास लाखांचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावास मिळाले आहे. तसेच स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात व विभागात प्रथम क्रमांक पटकावून गावाची राज्य पातळीवर निवड झाली असून तेथेही त्यांना यश मिळेल असा विश्‍वास गावकरी     व्यक्त करतात. 

संपूर्ण गावालाच विमाकवच

ग्राम स्वच्छता अभियानात मराठवाड्यात प्रथम आलेल्या गावातील 18 ते 68 वर्षे वयोगटातील नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विमा काढला जात आहे.