Wed, Jul 15, 2020 17:47होमपेज › Marathwada › डॉ. पद्मसिंह पाटील आज सहकुटुंब भाजपमध्ये

डॉ. पद्मसिंह पाटील आज सहकुटुंब भाजपमध्ये

Published On: Sep 01 2019 1:48AM | Last Updated: Sep 01 2019 1:48AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सावलीसारखे साथ देणारे व त्यांचे अत्यंत विश्वासू डॉ. पद्मसिंह पाटील यांचे कुटुंबच भाजपमध्ये दाखल होणार आहे. डॉ. पाटील यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी (दि. 31) आयोजित परिवार संवाद मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रवेश करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापुरात रविवारी (दि. 1) महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेवर यानिमित्ताने पडदा पडला. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास लेडीज क्लब मैदानावर आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. पाटील यांच्या विकासकामांचा उलगडा करीत मधल्या काळात विकासकामे करण्यात कशा अडचणी आल्या याची मांडणी केली. लोकसभा निकालावरही त्यांनी भावनिक चर्चा केली. ‘सबका साथ, सबका विकास’ होत असताना जिल्हा विकासकामांत मागे राहू नये, डॉ. पाटील यांची विकासाची तपश्चर्या व्यर्थ ठरू नये, यासाठी आपल्याला भाजपमध्ये प्रवेश घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. 

धनंजय महाडिक यांचा आज भाजप प्रवेश

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापुरात होणार्‍या कार्यक्रमात महाडिक यांचा प्रवेश होणार आहे. महाडिक यांच्या भाजप प्रवेशाने जिल्हा राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे. 

महाडिक यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आठ दिवसांत कोल्हापुरात मोठा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील महाडिक गटासह त्यांना मानणारे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी आदींचा भाजप प्रवेश होणार आहे.

ठाणे जि. प. उपाध्यक्षांसह चार सभापती सेनेत
ठाणे : खास प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष पवार हे भाजप की शिवसेनेत दाखल होणार या चर्चेला शनिवारी पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष पवार, चार सभापती, चार झेडपी सदस्यांसह दोन तालुका प्रमुखांच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा सोपवला.

मुरबाडचे चार वेळा आमदार राहिलेले गोटीराम पवार यांचे सुभाष पवार हे पुत्र असून ते झेडपीचे उपाध्यक्ष आहेत. पवार पितापुत्रांना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला झेडपीच्या सत्तेत सहभागी करून भाजपला धक्का दिला होता. आता त्याच उपाध्यक्षांसह चार सभापती व दोन तालुकाप्रमुखांना शिवसेनेत आणून भाजपला पुन्हा दणका दिला आहे.

सुभाष पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.