Sun, Jul 05, 2020 06:40होमपेज › Marathwada › यवतमाळ : भर पावसात जिल्हाधिकार्‍यांकडून नुकसानीचे सर्वेक्षण!

यवतमाळ : भर पावसात जिल्हाधिकार्‍यांकडून नुकसानीचे सर्वेक्षण!

Last Updated: Oct 31 2019 3:45PM
यवतमाळ : प्रतिनिधी 

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस व सोयाबीनला चांगलाच फटका बसला. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने बुधवारी (दि. ३०) भर पावसात थेट आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांना धीरही दिला. 

परतीच्या अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात कापुस, तुर, ज्वारी व सोयाबीन आदी  पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आर्णी तालुक्‍यातील लोणबेहळ येथील नीलेश आचमवार यांनी जिल्हाधिकारी अतुल गुल्हाने यांना बुधवारी अकराला दूरध्वनी करून परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत माहिती दिली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी गुल्हाने स्वत: जिल्हा कृषी अधीक्षक कोळपकर, विमा प्रतिनिधी,  तहसिलदार धीरज स्थूल, तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड, तलाठी सौ. पवार यांच्यासह प्रथम सुकळी व नंतर लोनबेहळ येथील शेतात पाहणीसाठी गेले. 

त्यांनी सोयाबीन व कापसाच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर कोसदनी व साकूर येथील शेतात पोहोचताच ढगाळ वातावरण तयार झाले. काही मिनिटांतच पावसाला सुरुवात झाली. पावसाची तमा न बाळगता शेतातील सोयाबीन व कापसाची पाहणी केली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना वाईट वाटले. त्यावेळी झालेले नुकसान भरून निघणारे नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दोन दिवसांत संपूर्ण तालुक्‍यातील शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण पुर्ण करण्याचे आदेश देण्यात येईल आणि आलेले अहवाल त्वरित सरकारदरबारी पाठविला जाईल. तसेच सरकारदरबारी मदतीची मागणी करण्यात येईल असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी साकूर येथील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून देण्याची मागणी केली. 

यावेळी पुरुषोत्तम गावंडे यांच्यासह लोनबेहळ येथील शेतकरी नीलेश आचमवार, सुरेंद्र राऊत, शांतिलाल जयस्वाल, धीरज बघेल, योगेश तिवारी, शुक्‍ला, मोरे, कोसदनी येथील दीपक ठाकरे, अनिल ठाकरे, सरपंच दिनेश ठाकरे, देवेंद्र ठाकरे, साकूरचे सरपंच बाबाराव चव्हाण उपस्थित होते. 

एक लाख पाच हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित 

प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास एक लाख पाच हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानाचे अर्ज कृषी सहायक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

आर्णी तालुक्‍यातील १०५ गावांना फटका! 

आर्णी तालुक्‍यात एकूण सात हजार २४७ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात पाच हजार ६९० हेक्‍टरवरील सोयाबीन आणि एक हजार ५५७ हेक्‍टरवरील कापसाचा समावेश आहे. तालुक्‍यातील सर्व  १०५ गावांना पावसाचा फटका बसला असून बाधित शेतकऱ्यांची संख्या दोन हजार ७०० च्या घरात आहे. 

विमा नसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल काय? 

ज्या शेतकऱ्याने पीककर्ज घेतले नाही किंवा पिकांचा विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांना कोणती मदत मिळेल, असा प्रश्‍न एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना विचारला. हा प्रश्‍न ऐकून जिल्हाधिकारीही पेचात पडले, त्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे असल्याचे मत व्यक्त करून या प्रश्‍नाला बगल दिली. मात्र त्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला. 

कृषी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. मी पाहणी केली आहे. नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला पाठविण्यात येणार आहे. 
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ