Wed, Jul 08, 2020 10:14होमपेज › Marathwada › लिलावाचे गावच विकासापासून कोसोदूर

लिलावाचे गावच विकासापासून कोसोदूर

Published On: Dec 29 2018 1:37AM | Last Updated: Dec 28 2018 9:58PM
पालम : प्रतिनिधीे

महसूलमंत्री पाटील यांनी वाळू लिलावात बदल करून गावांना 25% रक्कम परतावा म्हणून देण्याचे आदेश काढले होते. या रक्कमेतून या गावाचा विकासाचा मार्ग मोकळा होईल असे वाटले होते, परंतु तसे न होता सांवगी थडी हे गाव आजही विकासापासून कोसोदूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

सांवगी हे गाव गोदाकाठावर असून मागील अनेक वर्षांपासून रेती लिलाव होत आहे, नियमावलीप्रमाणे वाळू ठेकेदार उपसा करण्याऐवजी बेसुमार उपसा करत आहे. परिणामी या पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले.  

यात काही नागरिकांना जीव गमवावा लागला.  गावाशी  जोडणारे रस्त्याचीही बिकट अवस्था झाली आहे. गोदाकाठावरील रस्ते अल्पावधी काळातच खराब होऊन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे दररोज ये-जा करणार्‍या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बंदी कागदावर, ट्रॅक्टर व हायवा रस्त्यावर  

नदीपात्रातील वाळू उत्खननावर महसूल प्रशासनाने कितीही बंधने घातली तरी शहरात सर्वच भागात बांधकामासमोर अनेक ढिगारे आढळून येतात. याचाच अर्थ वाळू उत्खनन चालू आहे असा होतो. शहरात रात्रीचा दिवस करून ट्रॅक्टर व हायवा या वाहनाद्वारे वाळूचा पुरवठा करण्यात येतो हा सर्व प्रकार वाळूबंदी कागदावर व हायवा रस्त्यावर म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे हा प्रकार थांबणे आवश्यक आहे.

अवैध मार्गाने उत्खनन केल्यास कारवाई  

गोदावरी नदीवरील वाळू लिलावाची प्रक्रिया बंद आहे. या पात्रात चोरट्या मार्गाने कोणी अवैध वाळूचे उत्खनन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मागील सहा महिन्यांपासून गौण खनिज कायद्यांतर्गत 30,94388 रुपयांची वसुली झाली. 54 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 12 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. 
    - श्रीरंग कदम, 
    तहसीलदार, पालम.