Mon, Aug 03, 2020 14:55होमपेज › Marathwada › पाच शाळांवर संक्रांत

पाच शाळांवर संक्रांत

Last Updated: Jan 17 2020 1:14AM
परभणी : नरहरी चौधरी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कुठलीही मान्यता न घेता अनधिकृतपणे चालविल्या जाणार्‍या पाच शाळांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे अनधिकृत आणि नियमबाह्यपणे सुरू असलेल्या शाळा रडारवर आल्या आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून अनेक शाळांनी मनमानी कारभार करत जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कुठलीही मान्यता न घेता शाळा सरू केल्या. तसेच मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार भौतिक सुविधांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी अशा शाळांची तपासणी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार काही शाळांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये अनेक शाळांत शिक्षण हक्‍क कायद्याचे सर्व नियम संबंधित संस्थाचालकांनी धाब्यावर बसविल्याचे या तपासणी मोहिमेदरम्यान निदर्शनास आले आहे. काही शाळांना शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेताच शाळा सुरू केली आहे. तर काहींनी एका ठिकाणी प्रवेश दाखवून भलत्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले आहेत. तर काही शाळांत जे वर्ग मान्य नाहीत आणि जे शैक्षणिक माध्यम मान्य नाहीत असे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आणले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा सर्व शाळांची तपासणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे नुकताच प्राप्त झाला आहे.

शिक्षण विभागाचे नियम डावलून सुरू असलेल्या आई इंग्रजी स्कूल पाथरी, लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल पाथरी, पंडित दीनदयाल उपाध्याय गंगाखेड, गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल पाथरी, रयत इंग्लिश स्कूल पाथरी या पाच शाळांचा तपासणी अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. यातील बहुतांश शाळांनी भौतिक सुविधा पूर्ण केलेल्या नाहीत. तसेच  शिक्षण विभागाचे नियम देखील पाळले नाहीत. असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सदर शाळांवरील पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळांना मान्यता आहे किंवा नाही याची पालकांनी तपासणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या शाळा बंद झाल्यास अन्य शाळांत समायोजित करण्याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे सांगण्यात आले. 

नियम न पाळणार्‍या आणि मान्यता न घेणार्‍या अनधिकृत शाळांची तपासणी करण्याचे मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाथरी तालुक्यातील चार आणि गंगाखेडमधील एका शाळेचा अहवाल अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालाआधारे दोन दिवसांत त्या शाळांवर नियमानुसार कार्यवाही केली जाईल.    - डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) परभणी

मानवतची शाळा पाथरीला

• मानवत येथील आई इंग्लिश स्कूल ही शाळा मानवतऐवजी पाथरीला सुरू आहे. शाळा अनधिकृत जागेवर सुरू आहे, हे विशेष. प्री प्रायमरी शाळा असल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे असले तरी सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग तपासणी पथकाने भेट दिली असता सुरू होते. एकूण विद्यार्थी संख्या 137 आहे. 

• पाथरी येथील गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल जायकवाडी वसाहतीत आहे. या शाळेच्या नावावर भाडेपत्र नाही. पाटबंधारे विभागाने लोणार शिक्षण प्रसारक मंडळाला कॉलेज सुरू करण्यास मान्यता दिली आहे. असे असताना पहिली ते पाचवीपर्यंत 125 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

• पाथरीतील लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल शाळा वैद्यनाथ बँकेजवळ शिक्षक कॉलनी रोड येथे सुरू आहे. शाळा स्थलांतरीत करताना संस्थेने माहिती दिली नाही.

• पाथरी येथे असणारी रयत स्कूल ही इंग्रजी शाळा असली तरी शिक्षण मात्र सेमी पद्धतीने दिले जाते. या शाळेकडे कोणत्याही प्रकारची शासकीय कागदपत्रे आढळली नाहीत. शाळेची विद्यार्थी संख्या 200 आहे.

• गंगाखेड येथील पं. दीनदयाळ शाळा पत्र्यात भरते. शाळेत विद्याथिर्र्नींसाठी स्वच्छतागृह नसल्याचे आढळले. तसेच वीजपुरवठ्याचा अभाव व पत्र्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.