Mon, Jul 13, 2020 08:17होमपेज › Marathwada › परळी : उड्डाण पुलावरील कोंडीने नागरिक त्रस्त (video)

परळी : उड्डाण पुलावरील कोंडीने नागरिक त्रस्त (video)

Published On: Aug 23 2019 4:16PM | Last Updated: Aug 23 2019 4:16PM

परळीच्या उड्डाण पुलावर वाहतुक कोंडीपरळी वैजनाथ : प्रतिनिधी

शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाण पुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच विषय बनलेला आहे. आज (दि.२३) दुपारी पुन्हा एकदा याच मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. उड्डाण पुलावर तब्बल दोन ते अडीच तास वाहतूक जागेवरच ठप्प झाली.    

उड्डाण पूल आणि बसस्टँड रोडवर दोन ते अडीच तासापासून उड्डाण पुलावर ट्राफिक जाम झाले. या ट्रॅफिक जाममुळे शाळकरी विद्यार्थी व वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे कर्मचारी वेळेत न आल्याने वाहतूकदार चांगलेच खोळंबले. शहरातला उड्डाणपूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन येथे बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. 

शुक्रवारी दुपारी उड्डाणपूलावर एक वाहन पंक्चर झाल्याने तब्बल दोन ते अडीच तास उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांना, मुलांना रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळे वैद्यनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी येथे जास्त आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास भाविकांना होत आहे. वाहतूक सुरळीतपणे करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बायपासचे भिजत घोंगडे 

बीड आणि गंगाखेड रस्त्यास जोडणाऱ्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पूल परळीची वाढती लोकसंख्या आणि बाहेर गावावरून येणारी वाहतुकीला कमी पडत आहे. शहराला बायपासची आवश्यकता असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. बायपास मंजूर असताना देखील त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. हा बायपास सुरू झाल्यास शहरातली वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मात्र मंजुरी असताना देखील बायपासचे भिजत घोंगडे मार्गी लागण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

समांतर उड्डाण पूलाची ही प्रतिक्षा

दरम्यान शहर वाहतूक व वाढती व्याप्ती लक्षात घेऊन या उड्डाणपूलाला आणखी एक समांतर उड्डाणपूलाची मागणी ग्राह्य धरण्यात आली आहे. लवकरच असा समांतर उड्डाणपूल निर्मिती सुरू होईल असे वाटले होते मात्र, समांतर उड्डाणपूलाची ही प्रतिक्षा कायमच आहे. 

रेल्वे सबवे ही अडकला

रेल्वे फलाटाजवळील रेल्वे सबवे सुरू झाला तर दुचाकी वाहने या रस्त्यावरून जावू शकतात. काही प्रमाणात वाहतूकीवरील ताण कमी होईल यादृष्टीने हा सबवे सुरू करण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरूच आहेत. परंतु रेल्वेच्या मंजुरीत हा रस्ता अडकला आहे.