होमपेज › Marathwada › एक्झिट पोलवरून काँग्रेसच्या गोटात चिंता

एक्झिट पोलवरून काँग्रेसच्या गोटात चिंता

Published On: May 21 2019 1:49AM | Last Updated: May 21 2019 1:49AM
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस 48 तासांचा कालावधी शिल्‍लक राहिला असून सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर रविवारी सायंकाळी देशातील मतदारांचा कौल जाहीर करण्यात आला. यामध्ये नांदेड लोकसभेची जागा भाजपला काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये धाकधूक वाढली आहे.

कसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात दि. 11 एप्रिल ते 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. दीड ते पावणेदोन महिन्याचा कालावधी लोकसभा निवडणुकीचा व्यग्र राहिला होता. यात नांदेड लोकसभेसाठी तिसर्‍या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. एक महिना पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दि. 23 मे रोजी प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. या मतमोजणीपूर्वी लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीपूर्व अंदाज रविवारी जाहीर होणार होते. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. रविवारी सायंकाळी देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे अंदाज समोर आले असून नांदेडच्या बाबतीत विविध वृत्तवाहिन्यांनी भाजपाच्या बाजूने कौल दर्शविला आहे. 

भाजपच्या बाजूने वाहिन्यांनी अंदाज वर्तविल्याने भाजपच्या गोटामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून पंधरा वर्षांनंतर भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर इकडे वृत्तवाहिन्यांनी दाखविलेल्या सर्व्हेवरून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह आला, असून अशा प्रकारचा सर्व्हे एकतर्फी असून यात काही तथ्य नसून अंदाज आणि वास्तवात बराच फरक असतो, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांचा पराभव होत असल्याचे मोठमोठे मथळे वाहिन्यांनी दाखविल्यानंतर या संदर्भात अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली असता या निवडणुकीत काँग्रेसचाच विजयी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. यावर भाजपच्या गोटातून जाहीरपणे प्रतिक्रिया आली नाही.

लोकसभेची निवडणूक अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात झाली असली, तरी अप्रत्यक्षपणे भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर ती लढली. याचा फायदा भाजपला काहीअंशी झाला आहे, परंतु शेवटच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांनी जोरदारपणे चक्र फिरविल्याने काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच विजयी होईल, असे अंदाज काँग्रेसकडून पूर्वीपासून बांधले जात आहेत. 

किमान वीस ते पंचवीस हजार मतांनी अशोक चव्हाण विजयी होतील, असे सांगितले जात असताना विविध वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे सर्वांना दि. 23 मे ची प्रतीक्षा लागली आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र काय निकाल देते, यावरच विश्‍वास ठेवावा लागणार असून त्यासाठी अजून 48 तासांची प्रतीक्षा आहे.