Mon, Jul 13, 2020 23:11होमपेज › Marathwada › युती गेली खड्ड्यात, पहिले शेतकर्‍यांचे बोला

युती गेली खड्ड्यात, पहिले शेतकर्‍यांचे बोला

Published On: Jan 10 2019 1:45AM | Last Updated: Jan 09 2019 11:02PM
बीड : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा गेली खड्ड्यात. पहिल्यांदा माझ्या शेतकर्‍यांचे काय करता ते बोला. तुमचे दिवस आता राहिलेत तरी किती, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी प्रहार केला. 

उद्धव ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या मराठवाडा दौर्‍यावर आहेत. ठाकरे यांची बीडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी कर्जमाफी, शेतकरी, राम मंदिर, राफेल आदी मुद्द्यांवरून मोदींवर टीका केली.   
उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरत आहे. मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे. ही माझी शेवटची भेट नाही. ‘संधिसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या,’ राफेलसारखाच पीक विमा योजनासुद्धा घोटाळा आहे. घोषणांमुळे जनतेचं पोट भरणार नाही. 

खोटं बोलून अन्नदात्यांची फसवणूक करू नका. ना तुम्ही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू शकला ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकला, आम्ही मन की नाही तर जनची बात करतो. केंद्रीय पथक येऊन गेलं, तुमच्या हातात काही मदत पडली का? असा प्रश्‍न ठाकरे यांनी जनतेला केला. 

दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते, स्वस्तामध्ये घर देईन नुसतं असं बोलून घर मिळतं का? भाषणाच्या पावसाने पाण्याचा हंड भरत नाही. दिवाळीमध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेतर्फे 5 हजार कुटुंबीयांना धान्य वाटप केले. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. असे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले. नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छे वर्षही येऊ द्या, अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली. 

खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, असेही ठाकरे म्हणाले. बीड येथील आशीर्वाद लॉन्स येथे झालेल्या सभेस मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, चंद्रकात खैरे, आ. नीलम गोरे, जिल्हाप्रमुख कुडंलिक खांडे, सचिन मुळूक, सुनील धांडे, चंद्रकात नवले, बदामराव पंडित आदी उपस्थित होते.