Tue, Jul 07, 2020 08:03होमपेज › Marathwada › नांदेड : भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी आमदार लढत रंगणार 

नांदेड : भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी आमदार लढत रंगणार 

Published On: Oct 01 2019 5:34PM | Last Updated: Oct 01 2019 5:34PM

अशोक चव्हाण विरूद्ध बापूसाहेब गोरठेकर यांच्यात लढत होणार अर्धापूर  : प्रतिनिधी 

अर्धापुर तालुक्याचा समावेश असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपकडून मैदानात उतरले आहे. गेली अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर मंगळवारी दुपारी भाजपाच्या पहिल्या यादीत बापूसाहेब गोरठेकरांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे येथे माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी आमदार अशी रंगतदार लढत होणार आहे. 

भोकर विधानसभा मतदार संघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर भोकर विधानसभेतून ते पुन्हा एकदा विधानसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते गेल्या दोन महिन्यांपासून भोकरमध्ये तळ ठोकून आहेत. या ठिकाणच्या मतदारसंघात त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. अशोक चव्हाणांनी रात्रीचा दिवस करून प्रचारात आघाडी घेतली आहे. यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यालाही चांगलेच कामाला लावले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव करण्याचा चंग बांधलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. याच भोकर मतदारसंघातून त्यांचे वडील कै. बाबासाहेब गोरठेकर यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले होते. बापूसाहेब गोरठेकर हे यापुर्वी नायगाव मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचाही जनसंपर्क या भागात चांगला होता. याचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत होईल आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामदेव आयलवाड यांच्या उमेदवारीचा भाजपाला चांगलाच फायदा होईल असा आत्मविश्वास भाजपला वाटत आहे.  

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भोकर मतदार संघातून काँग्रेसला केवळ ४ हजार ७०० चे मताधिक्य मिळाले होते. त्यात या निवडणुकीत शिवसेना-भाजपा- रिपाई-रासप, महायुती झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या या भागात लोकसभेपेक्षा युतीचे बळ वाढले आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराचे मनोधैर्य व बळ वाढले असून त्यांनाही विजय जवळ असल्याचे वाटत आहे. त्यासोबतच भाजप अशोक चव्हाण यांना फक्त भोकर  मतदारसंघात गुंतून ठेवण्यातही यशस्वी होणार आहे. 

उमेदवारी जाहीर होताच भोकर मतदारसंघातील युतीच्या कार्यकर्त्यांनी अर्धापूर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.