Tue, Jul 14, 2020 02:07होमपेज › Marathwada › शतकापासून रखडलेला रेल्वे प्रश्‍न ऐरणीवर

शतकापासून रखडलेला रेल्वे प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Dec 06 2018 1:36AM | Last Updated: Dec 06 2018 1:36AM
गेवराई : विनोद नरसाळे

बेलापूर-परळी रेल्वेमार्ग मागील 100 वर्षापासून प्रलंबित आहे. रेल्वेमार्गासाठी शासनाने लेखी आश्वासन देऊनही याची पूर्तता न केल्याने हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या रेल्वेमार्गासाठी कुकाना (श्रीरामपूर) येथे पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी (दि. 5) गेवराई तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील बेलापुर (श्रीरामपुर)- नेवासा - शेवगांव - गेवराई  मार्गे परळी या 100 वर्ष प्रलंबीत रेल्वेमार्गासाठी 1 ते 7 डिसेंबर 2017 या कालावधीत कुकाणा येथे आंदोलन केले होते. यावेळी शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्यापही पुर्तता न झाल्याने गत 1 डिसेंबर पासुन पुन्हा नेवासा याठिकाणी आंदोलन सुरू केले. या प्रकरणी गेवराई तहसील कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कृती समितीचे अंजीर पवार, शरद आहेर, अझहर इनामदार, लक्ष्मण आहेर, विनोद खरात, सतिश आहेर, ज्ञानेश्वर वडघणे उपस्थित होते.

बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचे फायदे : या रेल्वेमार्गामुळे देशाचे पुर्व व पश्चिम टोक जोडले जाणार आहे. यामुळे रोजगार व नोकर्‍यांच्या संधी निर्माण होतील. श्रीरामपुर, नेवासा, शेवगाव, गेवराई, परळी या तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल. बाजारपेठेत भर पडून प्रत्येक गावाचा विकास गतीने होईल. शेतीमालाला योग्य बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी दळणवळणाची सोय होईल. साखर परराज्यात जाईल तर गेवराई ते शिर्डी व गेवराई ते तिरुपती बालाजी हे 550 किलोमीटर कमी होईल. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांच्या बाजारपेठा आपल्या जिल्ह्याला व तालुक्याला जोडल्या जातील. सर्व स्तरातील शेतकरी, काटकरी, व्यापारी कारखानदार, बेरोजगार जनतेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ आदी फायदे हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर होतील अशी माहिती रेल्वे कृती समितीच्या वतीने देण्यात आली.

पक्ष-संघटनांचा पाठिंबा

रेल्वे कृती समितीच्या आंदोलनाला शिवसेना नेते बदामराव पंडित, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, जयदिप गोल्हार, पंचायत समिती सदस्य शाम कुंड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डाके, डॉ. उध्दव घोडके, मनोज शेंबडे, सचिन आहेर, बबलू खराडे, भारीप तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड, प्रदिप तुरुकमारे आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. रेल्वे  प्रश्‍नी प्रकरणी शासनाने दखल न घेतल्यास रेल्वे कृती समितीसोबत राहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नेते, पदाधिकार्‍यांनी दिला.