Sun, Jul 05, 2020 16:54होमपेज › Marathwada › आई मूकबधिर तर वडिलांचे कायमचे आजारपण... 

‘करण’ चा शिक्षणासाठी भीक मागून संघर्ष 

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:22AMपाटोदा : महेश बेदरे

शासनाकडून सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळावे, यासाठी विविध योजना राबवून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. तरीही आजघडीला अनेक मुले केवळ आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहतात, तर अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही मिळेल त्या मार्गाने शिक्षण घेण्याची जिद्द काही मुलांमध्ये असते, ते यासाठी सतत संघर्ष करतात. अशाच प्रकारे 9 वीत शिकणारा करणचा शिक्षण घेण्यासाठी अक्षरशः दारोदार भीक मागून संघर्ष सुरू आहे.

करण सुदाम चव्हाण हा जामखेड येथील एका शाळेत 9 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी. गुरुवारी पाटोदा शहरात आठवडी बाजारच्या दिवशी प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन मला शिक्षण घेण्यासाठी वह्या पुस्तके व साहित्य घेण्यासाठी 1 रु, 2 रु मदत करा, अशी विनवणी करीत होता. त्याच्या सोबत त्याचे 8 वी पासचे प्रगतीपुस्तक देखील तो दाखवत होता. दैनिक पुढारी प्रतिनिधीने करणशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यावेळी त्याने आपली हृदयद्रावक कहाणी सांगितली.

तो म्हणाला की, मी जामखेड येथील रहिवासी असून, आई मूकबधिर तर वडील आजारपणामुळे कायमचे अंथरुणाला खिळलेले आहेत. घरात एक बहीण व आजी आहे, परिस्थितीच नसल्यामुळे बहिणीला शाळाच माहीत नाही. आजी दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरी करते, मात्र मला शिकायचे आहे व आता 15 जून ला शाळा सुरू झाल्यानंतर साहित्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून मी जवळपासच्या गावात  शिक्षणासाठी मदत मागत असल्याचे त्याने सांगितले.