Wed, Dec 11, 2019 00:30



होमपेज › Marathwada › मातंग समाजाच्या आरक्षणासाठी बीडच्या तरुणाची जलसमाधी

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी बीडच्या तरुणाची जलसमाधी

Published On: Mar 06 2019 1:46AM | Last Updated: Mar 06 2019 1:37AM




बीड ः प्रतिनिधी 

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारविरोधात व्हिडीओ तयार करून मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी करीत एका तरुणाने बीडजवळील पाली तलावात उडी मारून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओ क्‍लिपमध्ये मातंग समाजाच्या आरक्षणासाठी व फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी आत्महत्या करत असल्याचे मत त्याने व्यक्‍त केले आहे. 

संजय ज्ञानोबा ताकतोडे (वय 34, रा. साळेगाव, ता. केज) असे मृत तरुणाचे नाव आहे. संजय हा मंगळवारी सकाळी बीडजवळील पाली येथील तलावावर आला. धरणाच्या भिंतीवर उभे राहून त्याने एक व्हिडीओ बनवला. मातंग समाजाला 13 टक्के आरक्षणातून वेगळे आरक्षण देण्याची मागणी त्याने केली. याकडे दुर्लक्ष करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर त्याने टीका केली. फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी आपण जलसमाधी घेत असल्याचे त्याने या व्हिडीओमध्ये सांगितले. पाली तलावात तरुणाने जलसमाधी घेतल्याचे कळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बल्लाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्‍निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला व नंतर नातेवाईकांना देण्यात आला. घटनास्थळी या युवकाचे बँक स्टेटमेंट व त्याचा मोबाईल सापडला आहे. संजयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्‍त केली.