Wed, Sep 23, 2020 02:03होमपेज › Marathwada › बीड : बंद वेबसाईटमुळे हजारो शेतकरी विमा भरण्यापासून वंचित 

बीड : बंद वेबसाईटमुळे हजारो शेतकरी विमा भरण्यापासून वंचित 

Last Updated: Aug 01 2020 9:32PM
बीड : पुढारी वृत्‍तसेवा  

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास... अशी अवस्था बीड जिल्ह्याच्या पीक विम्याची झाली आहे. एकतर कोणतीच विमा कंपनी बीड जिल्ह्यात विमा घेण्यास इच्छूक नव्हती. त्यानंतर विमा कंपनीची मिनतवारी करून कसाबसा विमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात विमा भरण्यासाठी सातत्याने वेबसाईट बंद रहाणे, संथ गतीने विमा भरला जाणे... यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे हजारो शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. विमा भरण्यास काही मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी व काही संघटनांनी केली आहे. मात्र, याकडे ना लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले आहे, ना प्रशासकीय अधिकार्‍यांनी.बीड जिल्ह्यात शेतकरी संघटनेतील अग्रणी कालीदास आपेट, भाई गंगाभिषण थावरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे, प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे आदींनी पीक विमा भरण्यासाठी मोठी जनजागृती केली आहे. पीक विमा हा शेतकर्‍यांना आधार असल्याने प्रशासनानेही जनजागृती केली. यासह शेतकर्‍यांनाही या योजनेचे महत्त्व कळल्याने देशात सर्वाधिक प्रमाणावर बीड जिल्ह्यात विमा भरला जातो. विमा संदर्भात शेतकरी नेते व शेतकरी कमालीचे जागरुक असल्याने विमा कंपनीस शेतकर्‍यांवर अन्याय करता येत नाही, शिवाय कंपनीने भरपाई देण्यास विरोध केल्यास शेतकरी थेट न्यायालयात जातात किंवा आंदोलन करून विमा कंपनीस वेळेवर भरपाई देण्यास भाग पाडतात. 

एकतर बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ असतो, तर कधी अतिवृष्टी होते. यामुळे विमाही मोठ्या प्रमाणावर द्यावा लागतो. अशा कारणांमुळे विमा कंपनी बीड जिल्ह्यासाठी कंत्राट भरत नाहीत. गत रब्‍बी हंगामात कोणतीच विमा कंपनी पुढे आली नाही, त्यामुळे शेतकरी वंचित राहिले. या खरीप हंगामातही विमा कंपनीने कंत्राट भरले नव्हते. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. त्यामुळे शेतकरी नेते, शेतकरी, विविध संघटना यांच्याकडून विमा भरावा यासाठी दबाव वाढला होता. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. 

यानंतर बीड जिल्ह्यात 16 जुलै पासून विमा भरण्यास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस व सोयाबीन यांचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन या पिकांचे आताच काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर विमा भरत आहेत. 30 जुलैपर्यंत 17 लाख अर्ज विम्यासाठी शेतकर्‍यांनी भरले होते. दरम्यान, 30 व 31 जुलै या दोन दिवशी विमा भरण्यासाठी असलेली वेबसाईट अत्यंत संथ गतीने सुरू होती, तर वारंवार बंदही होती. त्यामुळे हजारो शेतकर्‍यांना विमा भरता आला नाही. एकतर विमा स्विकारण्यास इतर जिल्ह्यांपेक्षा 15 दिवस उशीर झाला. त्यानंतर शेवटच्या दोन दिवस वेबसाईट अतिशय संथ होती, त्यामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विमा भरण्यासाठी आणखी पाच दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटनेचे नेते यांनी केली आहे. 

पिकांवर अतिवृष्टीचे सावट...

गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पाऊस यावर्षी झाला आहे. बीड जिल्ह्यात सरासरी 666 मीमी पाऊस पडत होता. मात्र, गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळ असल्याने जिल्ह्याची सरासरी आता 638 मीमी पर्यंत खाली आली आहे. यावर्षी मात्र जुनपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत तिप्पटपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सध्याच सरासरीच्या 66 टक्के पाऊस झाला आहे. येत्या काळात मोठा पाऊस पडतो. त्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत. आताच गोदावरी, सिंदफणा या नद्यांच्या खोर्‍यातील जमिनीतील कापूस, सोयाबीन या पिकांना पाणी लागू लागले आहे. त्यामुळे येत्या काळात अधिक पाऊस झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर गाडे यांनी केली आहे. मुदतवाढ न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 

सीएससी केंद्रावर अर्ज पडून

शेकर्‍यांनी सेतू सुविधा केंद्रावर विम्‍यासाठी अर्ज दिले आहेत. मात्र, शेवटच्या दोन दिवशी विमा वेबसाईट अंत्यंत संथ होती. त्यामुळे विमा भरण्यात अडचणी आल्या. ज्या शेतकर्‍यांचे अर्ज भरता आले नाहीत, असे अर्ज सीएससी केंद्रावर पडून असून शेतकरी हतबल झाले आहेत. 

बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांनी 17 लाख 71 हजार विमा अर्ज भरले आहेत. विमा भरण्यामध्ये बीड जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे विमा भरण्यासाठी अधिक मुदत आता वाढविली जाणार नाही. 
- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड

 "