होमपेज › Marathwada › भाजप सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना

भाजप सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना

Published On: Nov 02 2018 1:28AM | Last Updated: Nov 02 2018 1:23AMअंबाजोगाई :  प्रतिनिधी

भाजपाचे सरकार म्हणजे घोषणांचा कारखाना आहे. यांनी गेल्या साडे चार वर्षांमध्ये केवळ घोषणा केल्या आहेत. सरकार झोपी गेलेले नसून झोपेचे सोंग घेतले आहे. आता मध्यम व गंभीर दुष्काळ या नावाखाली शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केला.  

जनसंघर्ष यात्रेनिमित्त  गुरूवारी अंबाजोगाई येथे  वंजारी वसतीगृहाच्या मैदानात आयोजित केलेल्या  जाहीर सभेत खा.चव्हाण बोलत होते. यावेळी खा.मल्लिकार्जुन खर्गे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खा.रजनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना खा.चव्हाण म्हणाले, सध्या औरंगाबादला न्यायालयात प्रकरण सुरू असून दुष्काळाचा फक्त जीआर काढला आहे असे सांगितले गेले आहे. सरकारने दुष्काळाच्या नावावर शेतकर्‍यांची क्रूर थट्टा सुरू केली आहे. मंत्री संभाजी पाटील निलंगेकर दुष्काळाची पाहणी रात्री मोबाईलच्या लाईटमध्ये करत असल्याने आश्‍चर्य वाटते. अशा प्रकारची पाहणी म्हणजे राज्यातील जनतेची टिंगलच आहे.  स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याबाबत खा.चव्हाण यांनी पंतप्रधान यांना युनिटी म्हणण्याचा अधिकार आहे काय ? असा सवाल विचारला. पंतप्रधान सध्या फाळणी करण्याचे काम करत आहेत असा आरोप चव्हाण यांनी केला. देशाचे भविष्य अंधःकारमय आहे, संघर्ष आम्ही करू, तुम्ही सोबत राहा, जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी खासदार चव्हाण यांनी जनतेला केले. यावेळी खा.मल्लिकार्जुन खर्गे, माजी खा.रजनी पाटील यांची भाषणे झाली. या सभेस माजी मंत्री प्रा.सुरेशराव नवले,प्रा.सत्संग मुंडे, प्रा.टी.पी.मुंडे, माजी आ.सिराज देशमुख, माजी आ.नारायणराव मुंडे, जिल्हाअध्यक्ष राजकिशोर मोदी, मिनाक्षी पांडुळे, नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, नगराध्यक्ष आदित्य पाटील उपस्थित होते.