केज : प्रतिनिधी
येथील नगरपंचायतच्या महिला अधिकार्याने फोन न उचल्याने नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक रवी अंधारे याने त्यांच्या व्हाटसपवर अश्लील संदेश पाठवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजपचे रमेश आडसकर गटाच्या नगरसेवक अंधारे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यासह सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज नगरपंचायतच्या महिला अधिकारी या घरी असताना ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मध्यरात्रीच्या सुमारास बराचवेळ फोन आले. नंबर अनोळखी असल्याने त्यांनी फोन घेतला नाही. सकाळी मोबाईल पाहिला असता सात मिसकॉल पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी आपले व्हाटसप चालु केले असता मिसकॉल आलेल्या नंबर वरुन त्यांना अश्लील संदेश आल्याचे दिसुन आले.
महिला अधिकार्यानी नगरपंचायतचा शिपाई अतिक सय्यद यास मोबाईल वरुन फोन करत यासंबंधी माहिती घेण्यास सांगितले असता सय्यद याने सदर मोबाईल क्रमांक केज नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवि अंधारे यांचा असल्याचे सांगितले. संबंधीत महिला अधिकाऱ्यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रवि अंधारे यांच्या विरुद्ध महिला अधिकार्याच्या फिर्यादीवरून विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (अ),67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी नगरसेवक रवी अंधारे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबंधी अधिक तपास पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे करत आहेत.