Wed, Jul 08, 2020 10:33होमपेज › Marathwada › परळी वैजनाथ : तिर्थक्षेत्र विकास आराखड्यावरुन 'राजकीय ओरखडे'!

परळी वैजनाथ : तिर्थक्षेत्र विकास आराखड्यावरुन 'राजकीय ओरखडे'!

Published On: Aug 29 2019 4:41PM | Last Updated: Aug 30 2019 1:41AM

पंकजा मुंडे परळी वैजनाथ : प्रतिनिधी

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी रूपये आराखड्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीकडून एकमेकांवर राजकीय ओरखाडे सुरु झाले  आहेत. विशेष रस्ता अनुदानातून मंजूर झालेल्या २० कोटी रूपयांच्या शहरातील अंतर्गत रस्ते कामाचा तीर्थक्षेत्र आराखडा कामाचा शुभारंभ आज (ता.२९) होत आहे.  पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. 

केवळ १० कोटी रूपयांचाच निधी प्रत्यक्षात असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून १३३ कोटींचा फुगा म्हणजे परळीकरांची शुध्द फसवणुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता. यासाठी सरकारकडून प्रयत्न करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून घेतला. या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झालेला असल्याचे पालकमंत्री यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपाकडून परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र विकास योजनेच्या १३३ कोटी रूपयांच्या कामांचा शुभारंभ केला जात असला, तरी प्रत्यक्षात केवळ १० कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला. यामुळे केवळ मतांच्या राजकारणासाठी व आपण काहीतरी मोठे काम केले आहे हे दाखवण्यासाठी परळीकरांची व शिव भक्तांची फसवणुक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. 

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेस हरीहर तीर्थाजवळ दर्शनी मंडप, प्रतिक्षागृह, धर्मशाळा, यात्री निवास, स्वच्छतालयाचे बांधकाम, मेरू पर्वताजवळ कॉटेजचे बांधकाम, मेरु पर्वतावर उद्यान विकसित करणे, मंदिराकडे जाणारे रस्ते विकसित करणे, हरीहर तीर्थाजवळील उद्यान विकसित करणे, मंदिर व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे  हेलिपॅड, प्रदक्षिणा मार्ग विकसित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करणे, डोंगरतुकाई देवी पोच रस्त्याची कामे, तसेच तेथे उद्यान विकसित करणे, काळ्या दगडाच्या दीपमाळ बांधणे अशी अनेक कामे आराखड्यातून करण्यात येणार आहेत.

भाविकांना पायाभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.