Sat, Jul 11, 2020 19:36होमपेज › Marathwada › अंबाजोगाईच्या सखी मतदान केंद्रावर महिलाराज

अंबाजोगाईच्या सखी मतदान केंद्रावर महिलाराज

Published On: Apr 18 2019 10:41AM | Last Updated: Apr 18 2019 10:44AM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र या नावाने बूथ उभारण्यात आले आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे हे मतदान केंद्र लक्ष वेधून घेत आहे.

या मतदान केंद्रांमध्ये एकूण पाच बुथ असून सर्व महिला निवडणूक कर्मचारी म्हणून निवडणूक प्रक्रिया राबवत आहेत. सुरक्षिततेसाठी महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिंग एजंट म्हणूनही सर्व पक्षांच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा अद्ययावतपणे पुरविण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या बाहेर अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. मतदारांना उन्हाची झळ पोचू नये व मतदानाचा टक्का वाढवा यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी याठिकाणी रॅम्प, व्हील चेअर उपलब्ध आहे. मतदानासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. 

रांगोळी, स्टिकर्स, झाडांच्या कुंड्या, मतदानाचा अधिकार दाखवणारे पोस्टर्स, त्याचप्रमाणे सेल्फी पॉइंट ही करण्यात आला आहे. अनेक मतदार या सेल्फी खुर्चीवर बसून आपला सेल्फी काढताना दिसत आहेत.

मोरेवाडी मतदान केंद्रांमध्ये एकूण मतदान तीन हजार ५४० इतके आहे. महिला निवडणूक कर्मचारी निवडणूक प्रक्रियेचे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहेत. सखी मतदान केंद्राचे सुशोभिकरण करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केज येथील निवासी नायब तहसीलदार सुरेश आवाड तसेच नगरपालिकेचे स्वच्छता  निरीक्षक आनंद वेडे व स्थानिक ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोराडे यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ठिक ठिकाणी आम्ही भेटी देऊन सतर्कता पाळत आहोत. त्याच प्रमाणे निर्धोकपणे मतदान व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.