Mon, Jul 06, 2020 23:15होमपेज › Marathwada › छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक 

छत्तीसगड, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाईचे युवक 

Published On: Sep 24 2019 5:37PM | Last Updated: Sep 25 2019 1:49AM

शहेबाज म.फारूख मणियार, विजय नामदेव अंजानअंबाजोगाई (बीड) : रवी मठपती 

'मैं भी नायक, सी.एम. फॉर अ डे' या मोहिमेअंतर्गत छत्तीसगड व पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबाजोगाई येथील युवक अनुक्रमे शहेबाज म.फारूख मणियार व  विजय नामदेव अंजान या दोघांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत दहा हजार युवक सहभागी झाले होते. यापैकी अंतीम टप्प्यात बारा स्पर्धकांसाठी ऑनलाईन मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये मणियारला सर्वाधिक एक लाखाहून अधिक मते प्राप्त झाली.

२५ सप्टेंबर रोजी मणियार छत्तीसगडचा एक दिवसाचा  मुख्यमंत्री असणार आहे. तर विजय अंजान २६ सप्टेंबर रोजी पंजाब राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे. दोन्ही युवक हे अंबाजोगाई येथील असून दोघेही योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी नूतन विद्यालय व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. शहेबाज  मणियार याने इलेक्ट्रीक इंजिनियरींग पदवी प्राप्त केली आहे. सद्या तो मुंबई येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. 

अंजान हा अंबाजोगाई  येथील योगेश्वरी सायन्स कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. दोघांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ सुरेश खुरसाळे, यांच्यासह सर्व अंबाजोगाईकरांनी अभिनंदन केले आहे. 

येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ काँग्रेसने एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत युवकांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली जाणार आहे. 'मैं भी नायक, सीएम फॉर अ डे' असं या मोहिमेचं नाव आहे. यात खरोखर एक दिवसासाठी मुख्यमंत्री तर बनता येणार नाही, पण एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत मात्र घालवता येणार आहे. काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता आहे, त्या राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस घालवण्याची संधी युवकांना देणार आहे.

काँग्रेस पक्ष सध्या विविध पातळ्यांवर झगडत आहे. युथ काँग्रेसने तरुण मतदारांकडे मोर्चा वळवला आहे. 'वेक अप महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत अंबाजोगाईच्या शहेबाज म. फारूख व विजय नामदेव अंजान या दोन्ही युवकांना अनुक्रमे छत्तीसगड आणि पंजाब या राज्याचा एक दिवस का होईना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे.