Tue, Jul 07, 2020 17:27होमपेज › Marathwada › बीड : मांजरा धरणात पाणीसाठा वाढला

बीड : मांजरा धरणात पाणीसाठा वाढला

Last Updated: Oct 29 2019 12:18PM

मांजरा धरणअंबाजोगाई (बीड) : प्रतिनिधी

निसर्गाने मनावर घेतल्यास होत्याचे नव्हते होऊ शकते अन नव्हत्याचे होऊ शकते याचा प्रत्यय मांजरा धरणातील पाणीसाठ्यात परतीच्या पावसाने झालेल्या अनपेक्षित वाढीमुळे अनुभवास आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये समाधान कारक पडत आहे. इतके दिवस कोरडे पडलेल्या मांजरा धरणात आज २९ ऑक्टोबर रोजी ३२.४४ दलघमी ऐवढा पाणी साठा उपलब्ध झाला आहे. महिन्यापूर्वी धरणामध्ये अवघा ३ दलघमी इतकाच पाणीसाठा होता.

धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता २२४ दलघमी 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेले  मांजरा धरण गेल्या दोन वर्षातील पावसाच्या अवर्षणामुळे कोरडे पडले होते. मांजरा धरणातून अंबाजोगाई, लातूर, केज, कळंब, धारूर शहरांसह काही खेडेगावांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यातील चार महिने कोरडे गेल्याने मांजरा धरणांमधील पाणी साठ्यात कुठलीही वाढ होऊ शकली नाही. यामुळे लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत होती. तर विहिरी, बोअर्स कोरडे पडल्याने लोकांची अधिकच चिंता वाढली होती.

मात्र गेल्या दहा दिवसांपासून परतीचा पाऊस सर्वत्र समाधान कारक झाला. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये खूपच पाऊस पडला. तर सोमवारी रात्री केज आणि कळंब तालुक्यामध्ये पाऊस पडला. त्यामुळे एकाच रात्रीत मांजरा धरणातील पाणीसाठा ८ दशलक्ष घनमीटरने वाढला असून महिनाभरापूर्वी असलेल्या केवळ ३ दलघमी वरून सध्या मांजरा धरणात ३२.४४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा जपून वापरल्यास पाणी वर्षभर पुरू शकेल अशी माहिती अभियंता शाहुराज पाटील यांनी दिली.