Mon, Jul 13, 2020 08:20होमपेज › Marathwada › भाजपची राष्ट्रवादी सोबत छुपी युती : चंद्रकांत खैरे

भाजपची राष्ट्रवादी सोबत छुपी युती : चंद्रकांत खैरे

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:00AMअंबाजोगाई ः प्रतिनिधी 

स्व.गोपीनाथराव मुंडे हे शिवसैनिकाचा सन्मान करणारे होते, मात्र त्यांच्या नंतर भाजपमधील पदाधिकारी व त्यांची पुढची पिढी सन्मान करणारी नाही. भाजपची राष्ट्रवादी सोबत छुपी युती असल्याचा आरोप करून, जिल्ह्यातील सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे मत मराठवाडा संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे यांनी मांडले.

अंबाजोगाई, केज, परळी, माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक संपदा गडकरी, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, परळी मतदार संघ संपर्क प्रमुख प्रकाश तेलगोटे, महिला जिल्हा संघटक रत्नमाला मुंडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, संजय महाद्वार, नारायण काशीद, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, गणेश मोरे, वैजनाथ सोळंके आदींची उपस्थिती होती.

भाजपची राष्ट्रवादीच्या सोबत छुपी युती आहे. धनुष्यबाण हाच उमेदवार पाहून काम करा. एकजूट होऊन काम करा. 80 टक्के समाजकारण करण्याचे काम फक्त शिवसेना करत आहे. भाजपचा विजय म्हणजे मशिनचा विजय आहे. त्यामुळे आतापर्यंत जे काही झाले ते झाले शिवसैनिकांनी आपसातील वाद मिटवा व जोमाने कामाला लागा असा मंत्र त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी तर सूत्रसंचालन गजानन मुडेगावकर यांनी केले. कार्यक्रम नंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खा.खैरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

खा. खैरे म्हणाले की, मी स्वतः जिल्ह्यात लक्ष घालणार असून, भाजपने फसव्या घोषणा केल्या आहेत. मराठवाड्यातील शिवसेनेचे संख्याबळ वाढले तर राज्यात शिवसेनेची सत्ता येईल. शिवसेना आणि अंगीकृत संघटना सक्षम करा, घराघरापर्यंत पोहोचवा, बूथ यंत्रणा सक्षम करा, असे आवाहन खैरे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी संघटना बांधणी करा,असेही त्यांनी सांगितले.