Sun, Dec 08, 2019 06:27होमपेज › Marathwada › अनेक इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

अनेक इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

Published On: Sep 25 2019 1:49AM | Last Updated: Sep 25 2019 1:49AM
अहमदपूर : वीरेंद्र पवार

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारात खरी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या तरी बंडखोरीचा सामना प्रमुख पक्षांना करावा लागेल, असे दिसते. 

राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय भाजपच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार विनायकराव पाटील, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्या केंद्रे, अ‍ॅड. भारत चामे, तर काँग्रेसच्या गोटात डॉ. गणेश कदम, सिराज जहागीरदार यांची नावे चर्चेत आहेत.  2014 च्या निवडणुकीत विनायकराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार गणेश हाके तिसर्‍या क्रमांकावर राहिले. आगामी निवडणुकीसाठी विनायकराव आणि हाके दोघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याने या पेचातून मार्ग काढावा लागणार आहे. विनायकराव पाटील यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असून, महाजनादेश यात्रेच्या स्वागताच्या तीन नेत्यांनी वेगवेगळ्या स्वागत कमानी उभारून इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करून दाखविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, यात शंका नाही.