परभणी : प्रतिनिधी
कृषी विकासासाठी शेतमालास योग्य व शाश्वत भाव मिळणे आवश्यक असून शेतीनिगडीत मूलभूत सुविधांचे बळकटीकरण, योग्य कृषी तंत्रज्ञान, शेतकर्यांच्या सामर्थ्य निर्मितीवर भर द्यावा लागेल. त्यासाठी कृषी पदवीधर हे उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजेत. देशाच्या विकासात कृषी पदवीधारकांंनी आपले योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी केले़.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बुधवारी (दि.26)आयोजित 22 व्या दीक्षांत समारंभात दीक्षांत अभिभाषण करताना महापात्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.अशोक ढवण हे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा.संजय धोत्रे, राज्याचे कृषि, फलोत्पादन, दुग्धविकास व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कुलसचिव रणजित पाटील, शिक्षण संचालक डॉ.विलास पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. राहुल पाटील, लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, डॉ.आदिती सारडा, माजी कुलगुरू डॉ.एस.एस.कदम, डॉ.बी.व्यंकटेश्वरलु, डॉ.व्ही.के.पाटील, डॉ.के.पी.गोरे, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले, उपकुलसचिव डॉ.गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.त्रिलोचन महापात्रा म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात कृषि व कृषि संलग्न क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ व धोरणकर्ते यांच्या परिश्रमातून कृषि उत्पादनात वाढ होऊन देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. सद्यस्थितीत भारतीय शेतीसमोर अनेक आव्हाने असून यात जागतिक तापमानवाढ, सतत नैसर्गिक आपत्ती, जमिनीचा होणारा -हास, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतमालाच्या भावातील अस्थिरता आदी प्रमुख समस्या आहेत. गेल्या वर्षी देशात 277 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले असून जगात भात, गहू, दुग्ध, फळे व भाजीपाला, अंडी आदीच्या उत्पादनात आपण अग्रेसर आहोत. सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भारत सरकारचे उदिष्ट असुन शेती उत्पादनक्षपेक्षा अधिक उत्पन्नक्षम करण्याच्या धोरणावर शासनाचा भर आहे. याकरिता फायदेशीर व शाश्वत असा एकात्मिक शेती पध्दतीचा विकास करावा लागेल. कृषि संशोधनात रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन डॉ.आशा आर्या व डॉ.दयानंद मोरे यांनी केले.