होमपेज › Marathwada › दोन पद्मश्रीनंतर चौघांना कृषी पुरस्कार

दोन पद्मश्रीनंतर चौघांना कृषी पुरस्कार

Published On: Feb 13 2019 2:03AM | Last Updated: Feb 13 2019 2:03AM
बीड : प्रतिनिधी

एकाच वर्षी प्रतिष्ठेचे दोन पद्म पुरस्कार मिळाल्यामुळे जिल्ह्याची मान गौरवाने ताठ झाली असताना निष्ठेने शेती करणार्‍या चार भूमिपुत्रांना राज्य शासनाचे कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. भीषण अशा दुष्काळात मिळालेल्या या पुरस्कारांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सततच्या संकटांमुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या कृषी पुरस्कारांमुळे प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करण्याचे बळ मिळणार आहे.  

रमेश उत्तमराव सिरसाट हे केज तालुक्यातील आरणगाव येथील रहिवासी.1990 मध्ये पोलिस दलात नोकरी मिळाली असतानाही शेती करण्याकडे त्यांचा कल होता. 2000 पासून सिरसाट हे पूर्णवेळ शेती करू लागले. त्यांनी 15 एकरवर चिंच, बोर, सीताफळ, आंबा अशा 1200 फळझाडांची तर दोन हजारांहून अधिक शोभेच्या झाडांची लागवड केली. चिंच, आंबा ही झाडे पिढ्यान पिढ्या उत्पन्न देतात असे ते सांगतात. सुरुवातीला काही वर्षे पाणी असल्यामुळे बैलगाडीतून पाणी देत फ ळबागा जगविल्या. जिवापाड जपलेली झाडे आता मोठी झाली आहेत. याची दखल घेत शासनाने त्यांना वृक्ष लागवडीचा उद्यान पंडित पुरस्कार जाहिर केला आहे. आपेगाव (ता.अंबाजोगाई) येथील बालाजी बाजीराव तट यांना 35 एकर वडिलोपार्जित शेती. 2012 मध्ये इस्रायला जाऊन तेथील आधुनिक शेतीचा त्यांनी अभ्यास केला. आता पूर्णवेळ शेतीच करायची हे निश्‍चित करून 2014 मध्ये एक एकरात शेडनेट उभारुन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पुढे ऊस, सोयाबीन, हरभरा ही मुख्य पिके घेतली. 2012 मध्ये बालाजी तट यांनी ठिबक ऑटोमायझेशनचा केलेला जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी ठरला. दुष्काळावर मात करत आधुनिक पधदतीने शेती केल्याने त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहिर झाला आहे. दोन्ही शेतकर्‍यांना कृषी विभागाने मार्गदर्शन केले होते.

काय आहे ऑटोमायझेशन

बालाजी तट यांनी ऑटोमायझेशनचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग शेतात करुन तो यशस्वी करुन दाखवला. डीप एरिगेशन आणि ठिबकला ऑटोमायझेशन या मशीनची जोड देण्यात आली.  पिकांना आवश्यक त्या वेळेत हवे तेवढे पाणी या मशिनद्वारे देण्यात येते. त्यासाठी मशिनमध्ये प्रोग्राम फि ट करावा लागतो.

कृषी पुरस्काराचे मानकरी

राज्य शासनाने नुकतेच कृषी पुरस्कार जाहीर केले. 2015 मधील उद्यान पंडित पुरस्कार  रमेश उत्तमराव सिरसाट (आरणगाव ता.केज) तर बालाजी बाजीराव तट (आपेगाव, ता.अंबाजोगाई) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) जाहिर झाला आहे. 2016 चा उद्यान पंडित पुरस्कार शंकर महादेव जाधव (उदंडवडगाव ता.बीड) यांना आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधरण गट) येथील संतोष लक्ष्मण राठोड (वसंतनगर  तांडा ता.परळी) यांना जाहीर झाला आहे.