Fri, Sep 25, 2020 15:59होमपेज › Marathwada › बीड : धक्कादायक; पत्नीची हत्या करुन प्रेताचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये

बीड : धक्कादायक; पत्नीची हत्या करुन प्रेताचे तुकडे ठेवले फ्रीजमध्ये

Last Updated: Dec 10 2019 8:42AM

संग्रहित छायाचित्रमाजलगाव (बीड) : प्रतिनिधी 

माजलगाव शहरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा सापडला होता. या धक्कादायक प्रकाराचे गुढ उकलले आहे. सततच्या भांडणास कंटाळून घरात पत्नीची हत्या करून प्रेताचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून तब्बल दहा दिवस तो प्रेतासोबत दोन मुलांना घेऊन राहिला. हा धक्कादायक प्रकार माजलगाव शहरातील अशोकनगर या भागात घडला आहे. अखेर दहाव्या दिवशी हा खुनाचा प्रकार उघडकीस आला आणि पतीच्या हातात बेड्या पडल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले व संसार सुरू केला. संजय याने मुस्लीम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे राहत होता. या दाम्पत्यास दोन मुले होती.

सोमवारी सकाळी अशोकनगरमध्ये नाल्याकडेला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये आरोपी संशयित स्थितीत दिसून आला.

तसेच आरोपीची पत्नी रेश्मा मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलिस निरीक्षकांनी संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली. त्यातून त्याने आठ दिवसांपूर्वी (३० नोव्हेंबरला) पत्नीची धारधार शस्त्रानेच हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. तसेच फ्रीजमध्ये तिच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. हा प्रकार गंभीर असल्याने अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

 "