Sat, May 30, 2020 00:25होमपेज › Marathwada › परभणी : पूर्णा येथे ६५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई 

परभणी : पूर्णा येथे ६५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई 

Last Updated: Feb 24 2020 8:45PM

संग्रहित छायाचित्रपूर्णा (परभणी) : पुढारी वृत्तसेवा  

बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६५ कॉपी बहाद्दरांविरुद्ध सोमवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बारावी परीक्षेत कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भरारी पथकातील एका पथकाने शहरातील संस्कृती महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर तपासणी केली. यावेळी महाविद्यालयातील ३५ विद्यार्थी हे परीक्षेत कॉपी करताना आढळून आले असल्याने या विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. या पथकात उपजिल्हाधिकारी संजीव ससाणे होते. उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक तपासणी केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही तारांबळ उडाली होती. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कावलगाव येथील जय जवान जय किसान या महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला उपशिक्षणाधिकारी आणि तालुका भरारी पथकाने दुसऱ्या सत्रात भेट दिली. यावेळी राज्यशास्त्राचा पेपर सुरु होता. त्यावेळी ३० विद्यार्थी कॉपी करताना सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही  कारवाई परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे शैक्षणिक वर्तुळात बोलले जात आहे. 

दरम्यान, पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालय केंद्रावर हिंदी विषयाची परीक्षा संपल्यानंतर कॉपी पुरविणाऱ्या पांगरा व माटेगाव येथील युवकांमध्ये शनिवार हाणामारी झाली होती. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तीन युवकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.