Sat, Jul 11, 2020 19:15होमपेज › Marathwada › परळीतील ६० वर्षांपासूनचे कामगार कल्याण केंद्र बंद करण्याचा निर्णय!

परळीतील कामगार कल्याण केंद्र बंद करण्याचा निर्णय!

Published On: Apr 04 2019 11:10AM | Last Updated: Apr 04 2019 11:10AM
परळी वैजनाथ : रविंद्र जोशी

शहरात गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेले कामगार कल्याण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय कामगार कल्याण आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परळीत असलेले एकेक शासकीय कार्यालय हळूहळू बंद करणे किंवा इतरत्र पळविण्याचा घाट घातल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या मागे नेमके कोणाचे षडयंत्र आहे हे तपासून पाहावे लागणार आहे. दरम्यान राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मातब्बर नेत्यांचे गाव त्याचप्रमाणे मंत्री व विरोधी पक्षनेता ही  पदे परळीत आहेत. तरीही परळीतील  शासकीय कार्यालये बंद होत आसल्‍याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. 

परळी शहरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दोन कामगार कल्याण केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहेत. परळी शहर कामगार कल्याण केंद्र आणि थर्मल कॉलनी कामगार कल्याण केंद्र अशी दोन्ही केंद्र सातत्याने कामगार कल्याण विषयक योजना, उपक्रम, प्रशिक्षण, आदीबाबतीत नेहमीच अग्रेसर राहून कार्यरत आहेत. परळी शहर कामगार कल्याण केंद्राची स्थापना 1959 मध्ये झालेली आहे. गेल्या 60 वर्षापासून सुरु असलेले हे केंद्र प्रशासकीय निर्णयाचा बळी ठरले आहे. परळी तालुक्यातील विविध अस्थापनांमध्ये काम करणारे हजारो कामगार व त्यांच्याकुटुंबियांना या केंद्रांच्या माध्यमातून  सेवा दिली जात आहे. अतिशय सजगपणे ही दोन्ही केंद्र सुरु असतानांच अचानकपणे प्रशासकीय 'तुघलघी कारभारामुळे' परळी शहर कामगार कल्याण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याच्या निर्णयाचे कल्याण आयुक्तांचे पत्र येऊन धडकले आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्तांनी मकाक ०१/२०१९/प्र. क्र. ७/कामगार -१० दि. ३० जानेवारी २०१९ या संदर्भिय पत्रानुसार परळी शहर कामगार कल्याण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे प्रतिसाद नसलेले २२ केंद्र बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यानुसार हे केंद्र बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. लातुर मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या परळी शहर कामगार कल्याण केंद्राला या निर्णयामुळे फटका बसला आहे. मंडळाचे प्रतिसाद नसलेले २२ केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत असताना वास्तविक परिस्थितीचा कोणताही विचार न करता परळी शहर कामगार कल्याण केंद्र बंद करण्यात येत आहे.