होमपेज › Marathwada › राज्यात ४,२५२ ग्रामपंचायतींना इमारतच नाही  

राज्यात ४,२५२ ग्रामपंचायतींना इमारतच नाही  

Published On: Mar 24 2018 10:38AM | Last Updated: Mar 24 2018 10:47AMजळगाव बुद्रुक : वार्ताहर

खेड्यांकडे चला.! असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते, मात्र त्याच खेड्यातल्या जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील एकूण २८ हजार ६ ग्रामपंचायतीपैकी सुमारे ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना अजूनही स्वतःच्या इमारती नाहीत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सुमारे १०६ ग्रामपंचायतींना इमारती नसल्याची माहिती आहे.

राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान अंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी जो निधी दिला जात होता, तो २०१५-१६ पासून बंद करण्यात आला आहे. त्या ऐवजी 'बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत इमारत नसलेल्या ग्रामपंचायतीचा आढावा घेतला असता, मालेगाव-३५, निफाड-३०, चांदवड-१, सिन्नर-१०, येवला-६, नांदगाव-२४ (नांदगाव पंचायत समिती मधून मिळालेल्या माहितीनुसार) अशा १०६ ग्रामपंचायतींना स्वतःच्या इमारती नाहीत.

बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेनुसार,१ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १० लाख ८० हजार रुपये शासन देणार तर १ लाख २० हजार रुपये त्या-त्या ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून खर्च करायचे आहेत. तर १ हजार ते २ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १६ लाख २० हजार रुपये अनुदान शासन तर १ लाख ८० हजार रुपये स्वनिधी असे नियोजन या योजनेतून केले आहे.

२ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना मात्र या योजनेअंतर्गत इमारत बांधण्यासाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही.या ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून इमारत बांधकाम करण्याचे सूचित करण्यात आले आहे.