Fri, Nov 27, 2020 10:31



होमपेज › Marathwada › बीड : अंबाजोगाई पतसंस्थेत ५७ हजारांच्या चिल्लरसह २ लाखांची चोरी

बीड : अंबाजोगाई पतसंस्थेत ५७ हजारांच्या चिल्लरसह २ लाखांची चोरी

Last Updated: Nov 21 2020 5:41PM

संग्रहित छायाचित्र



अंबाजोगाई (बीड) : पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांची शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सायगाव नाका परिसरात असलेली अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था फोडून चोरट्यांनी ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केली. ही घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसांत अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. 

अक्षय मुंदडा हे अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. शहरातील सायगाव नाका परिसरात स्व. मीनाताई ठाकरे चौकात या पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलुपबंद कपाटात ठेऊन सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले होते. शनिवारी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. यानंतर शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली, असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग गुरुलिंगअप्पा सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 

अधिक वाचा : ब्रेकिंग : पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

अक्षय मुंदडा यांनी ही माहिती समजल्यावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय कांबळे करत आहेत. 

अधिक वाचा : जगातील सर्वात थर्ड क्लास पासवर्डची यादी जाहीर, यात तुमचा नाही ना!

मागील काही कालावधीत अंबाजोगाई शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. चोरट्यांनी थेट आमदारांची पतसंस्था फोडली तिथे आपल्या घरांच्या सुरक्षिततेचे काय होणार? या चिंतेने सर्वसामान्य नागरिकात दहशत पसरली आहे. 

चोरटे सीसीटीव्हीत कैद 

दरम्यान, पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. सदर फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तसेच, पोलिसांना चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले असून ठशांची शहानिशा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.