Thu, Jul 16, 2020 00:20होमपेज › Marathwada › धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

Published On: Aug 03 2019 6:05PM | Last Updated: Aug 03 2019 5:46PM

धनंजय मुंडे यांचा फोटो सोशल मीडियावरुन घेण्‍यात आला आहे. परळी वैजनाथ : प्रतिनिधी

तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या ऊसाची बिले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, यासह शेतकरी, शेतमजूर आणि परळी शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी ११.०० वाजता मोंढा मैदान येथून या मोर्चाची सुरुवात होणार असून स्टेशन रोड, अग्रवाल लॉज, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शिवाजी चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पीक विम्यामधून वगळण्यात आले आहे. याशिवाय मागील हंगामातील एकाही पिकाचा विमा मिळालेला नाही. 

शहर आणि तालुक्यातील प्रत्येक माणूस समस्यांनी ग्रासला गेला असल्यानेच त्यांचा आवाज शासन दरबारी पोचविण्यासाठी आयोजित या मोर्चाच्या माध्यमातून पीक विमा तातडीने द्यावा, साखर कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले द्यावीत, दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी.  

तसेच, तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, मागील काळातील थकीत अनुदाने, फळबागांची अनुदाने, तूर, उडीद, मुगाचे पैसे द्यावेत, परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावेत. खडका धरणात जायकवाडीचे पाणी सोडावे, परळी शहरासाठी चांदापूर प्रकल्पावरुन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करावी,  वॉटर ग्रीड योजनेत वाण, चांदापूर, बोरणा प्रकल्पाचा समावेश करावा, विद्युत मंडळाने दिलेली चुकीचे बीले रद्द करावीत, बायपास रस्त्याचे काम तातडीने सुरु करावेत, औष्णिक विद्युत केंद्रे सुरु करावे,  अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली.

या मोर्चात जास्तीत -जास्त संख्येने परळी शहर व तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे,  असे आवाहन तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.